वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने नाराजी व्यक्त करून क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीका केली आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी गेली काही वर्षे जस्टीन लँगर यशस्वीपणे सांभाळत होता. दरम्यान लँगर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील कराराची मुदत संपुष्टात आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लँगरला दीर्घ कालावधीची मुदतवाढ देण्यास नकार दर्शविला. त्यानंतर वादंग सुरु झाले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमी कालावधीची मुदतवाढ देण्याची ऑफर लँगरला दिली होती. पण लँगरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ही ऑफर धुडकावली. त्यानंतर प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आणि तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वीकारला.
या पार्श्वभूमीवर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाला अशी वागणूक देणे अयोग्य असल्याने आपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाबाबत निराश झाल्याचे वॉर्नने म्हटले. जस्टीन लँगरसमवेत आम्ही सर्वजण यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघातून खेळलो. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासामध्ये लँगर महान क्रिकेटपटू आहे. आयसीसीतर्फे लँगरचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून गौरव करण्यात आला होता. अशा क्रिकेटपटूला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आलेली वागणूक अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण वॉर्नने दिले आहे.
2018 साली लँगरची ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. याच कालावधीत डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावर एक वर्षांची बंदी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातली होती. अशा परिस्थितीत लँगरच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 2021 टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि त्यानंतर ऍशेस मालिका जिंकली आहे.









