2 ते 3 आठवडय़ांमध्ये लसीकरणाचा प्रारंभ होणार : पंतप्रधान मोदींकडून आनंद व्यक्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय औषध नियंत्रण महाधिकाऱयांकडून (डीजीसीआय) भारत निर्मित कोरोना लस कोव्हॅक्सिन आणि ऑक्सफर्डच्या कोव्हिशिल्डला अंतिम अनुमती प्राप्त झाली आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन आठवडय़ांमध्ये देशव्यापी लसीकरणाचा प्रारंभ होणार आहे. लसींना अंतिम अनुमती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, दुसऱया बाजूला विरोधी पक्षांनी या लसीकरणावरही राजकारण सुरू केल्याचे पहावयास मिळत आहे.
या दोन्ही लसींना आणीबाणीच्या स्थितीत उपयोगात आणण्यासाठी अनुमती देण्यात येत आहे, अशी घोषणा देशाचे औषध नियंत्रण महाधिकारी व्ही. जी. सोमानी यांनी रविवारी केली. या दोन्ही लसी पूर्णतः सुरक्षित असून त्यांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती केल्यानंतरच अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे या लसीसंबंधात व्यक्त होणाऱया शंका निराधार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
काही विपरीत परिणाम शक्य
कोणत्याही लसींचे काही विपरीत परिणाम (साईट इफेक्टस्) होतात. तसेच या ही लसींचे आहेत. मात्र ते चिंता करण्यासारखे नाहीत. सौम्य ताप, ऍलर्जी किंवा कळा येणे या स्वरूपांमध्ये ते असू शकतात. तथापि, ते बहुतेक सर्व नागरिकांच्या संदर्भात सहन करण्याजोगे असतात. कोव्हिशिल्ड ही लस 70.42 टक्के प्रभावी आहे, अशी माहितीही सोमानी यांनी त्यांच्या वक्तव्यात दिली.
कोव्हॅक्सिनही सक्षम
पूर्णतः भारतात निर्मित असणारी कोव्हॅक्सिन ही लस सक्षम आहे. तिचे प्राण्यांवर यशस्वी प्रयोग झाले आहेत. यासंबंधीची माहिती उपलब्ध झाली आहे. या लसीची प्रथम आणि द्वितीय टप्प्यांमधील परीक्षणे पूर्ण झाली आहेत. 800 जणांवर या लसीचे प्रयोग करण्यात आले असून ही लस पूर्णतः सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. मात्र, सर्व परीक्षणे पूर्ण होण्यापूर्वीच भारतीय लसीला अनुमती देण्यावर काँगेसच्या काही नेत्यांनी टीका केली असून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
30 कोटी लोकांना लस देणार
लसीकरणाच्या प्रथम टप्प्यात 30 कोटी लोकांना ही लस देण्यात येईल. त्यात सरकारी कर्मचारीवर्ग, आरोग्य सेवक व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, ज्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे असे वयोवृद्ध इत्यादींचा समावेश असेल. हा प्रथम टप्पा ऑगस्ट 2021 अखेरीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन
दोन्ही लसींना अंतिम संमती मिळाल्याने पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. गेले वर्षभर कोरोनाशी झुंजणाऱया सर्व भारतीयांसाठी हे वृत्त अभिमान वाटण्यासारखे आहे. विशेषतः पूर्णतः भारतनिर्मित लसीला मान्यता मिळणे हे आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. अगदी पायाभूत पद्धतीने प्रारंभ करून एक उत्कृष्ट लस निर्माण करणाऱया सर्व भारतीय डॉक्टर्स, तंत्रज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञांचे मी अभिनंदन करतो, अशी प्रशंसा त्यांनी केली आहे.
केंद्र सरकारला 200 रुपयात
कोव्हिशिल्ड या ऑक्सफर्ड निर्मित लसीचे उत्पादन भारतात सिरम या संस्थेत केले जाणार आहे. या लसीचा एक डोस भारत सरकारला 200 रुपयांना विकण्यात येईल. तर इतरांना तो 1 हजार रुपयांना उपलब्ध केला जाईल, असे स्पष्टीकरण या संस्थेचे संचालक अदर पूनावाला यांनी दिले आहे.
भरपाई देण्याचा विचार करणार
लस घेतल्यानंतर तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया आल्यास आणि लस टोचून घेणाऱयाची शारीरिक हानी झाल्यास त्याला नुकसान भरपाई देण्याचा विचार सरकार करीत आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच या भरपाईची प्रक्रिया व नियम यासंबंधी माहितीही देण्यात आलेली नाही.
म्हणे नपुंसकत्व येईल
ही लस भाजपची असल्याने ती आपण टोचून घेणार नाही, असे वादग्रस्त विधान शनिवारी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केले होते. या विधानाचे समर्थन काँगेस नेते रशीद अल्वी यांनी रविवारी केले. या लसीचा दुरूपयोग विरोधी पक्ष नेत्यांविरोधात केला जाऊ शकतो, अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. तर या लसीमुळे नपुंसकत्व येऊ शकते, असा आरोप समाजवादी पक्षाच्या आणखी एका नेत्याने केला. या बेजबाबदार वक्तव्यांमुळे समाजमाध्यमांवर या नेत्यांविरोधात टीकेची झोड उठली आहे. लसीमुळे नपुंसकत्व येते हा बकवास आहे अशी प्रतिक्रिया अनेक संशोधक व तज्ञांनी व्यक्त केली. तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ‘लस कोणत्याही राजकीय पक्षाची नसते’ असे वक्तव्य करत लस टोचून घेण्याची तयारी दर्शविली. तसेच अखिलेश यादव यांच्यावर त्यांचे नाव न घेता टोला लगावत लसीकरणाचे समर्थन केले.