केरळ सरकारच्या हेल्पलाईनमध्ये सी. के. विनीत व पी. प्रिया यांचे मोलाचे योगदान, रोज अडीचशे जणांना मार्गदर्शन
वृत्तसंस्था/ कोईम्बतूर, कन्नूर (केरळ)
कोरोनाला हरवण्यासाठी देशातील डॉक्टर, पोलिसांसह प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. केरळचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सी. के. विनीतने एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. केरळ सरकारच्या कोरोनाविरुद्ध लढय़ात विनीतने आपले मोलाचे योगदान दिले आहे. विनीत केरळ सरकारच्या कोरोनासाठी असणाऱया हेल्पलाईन सेंटरमध्ये काम करत आहे. विशेष म्हणजे, नागरिकांना या विषाणूविरोधात लढण्यासाठी मदत करण्यासाठी त्याने या कामात सहभाग दर्शवला आहे. याशिवाय, केरळची आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉलपटू पी. प्रिया देखील कन्नूरमध्ये आरोग्य विभागाच्या हेल्पलाईन सेंटरमध्ये काम करत आहे.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू विनीत गत महिन्यात आयएसएलचा हंगाम संपल्यानंतर केरळमध्ये दाखल झाला. यादरम्यान, केरळमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. अशा परिस्थितीत विनीतने सामाजिक कर्तव्य जपताना केरळ सरकारच्या हेल्पलाईन सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या कामाबद्दल बोलताना विनीत म्हणाला की, सध्याच्या खडतर काळात जी काही मदत त्याच्याकडून शक्य आहे, तो करण्याचा प्रयत्न करत आहे. विनीत रोज 150 ते 200 कॉलला प्रतिसाद देत नागरिकांना सरकारच्या निर्णयासह उपाययोजनांची माहिती देत आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत नमूद करण्यात आले आहे. 28 मार्चपासून त्याने या कामाला सुरूवात केली आहे आणि लॉकडाऊन संपेपर्यंत तो हे काम करणार असल्याची प्रतिक्रिया विनीतने माध्यमांशी बोलताना दिली. देशभरात अनेक खेळाडू, उद्योजक मदतीसाठी पुढाकार घेत आहेत पण ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम करणाऱया विनीतचे देशभरातून कौतुक होत आहे. विनीतने 7 सामन्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. याचप्रमाणे आयएसएल स्पर्धेत तो जमशेदपूर या संघाचे प्रतिनिधीत्व करतो.
प्रियाचेही मोलाचे योगदान
आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉलपटू व गोकुलम केरळा क्लबची मुख्य प्रशिक्षका असलेल्या पी. प्रियानेदेखील आपले सामाजिक भान राखत केरळ सरकारच्या आरोग्य विभागात सहकार्यासाठी दाखल झाली आहे. कन्नूर येथे आरोग्य विभागाचे हेल्पलाईन सेंटर असून याठिकाणी रोज 200 हून अधिक फोन कॉल्सला प्रिया प्रतिसाद देत मार्गदर्शन करण्याचे काम करते.









