आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेली माहिती, सांगे आरोग्य केंद्रातील डॉक्टर, अन्य कर्मचाऱयांचा गौरव
प्रतिनिधी / सांगे
कोविड रुग्णांस तपासणीपासून सर्व सुविधा मोफत देणारे गोवा हे एकमेव राज्य असून शंभर टक्के लसीकरण हे आपले उद्दिष्ट आहे. ही महामारी कधी संपेल हे अजून कोणत्याही तज्ञाने सांगितलेले नाही. सध्या लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगे येथे बोलताना सांगितले.
आरोग्यमंत्री राणे यांनी सांगे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व डॉक्टर, परिचारिका, अन्य कर्मचारी, सफाई कामगार, फिल्ड स्टाफ आदींचा कोविड काळात केलेल्या कार्याची दखल घेत व लसीकरणात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल गौरव केला. राणे पुढे म्हणाले की, तुमच्याशिवाय कोविडची परिस्थिती हाताळणे शक्मयच नव्हते. तुम्ही लोक प्रत्यक्ष फिल्डवर काम करता. पहिला टप्पा यशस्वीरीत्या हाताळला. आता दुसरा टप्पा चालू आहे. त्यातही आरोग्य कर्मचाऱयांनी उत्तम कार्य केले आहे. याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावतीने मी तुमचे मनापासून आभार मानतो, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचे दिलेले उद्ष्टि साध्य करणे गरजेचे आहे. कंत्राटी कामगारांनी जे काम केले ते सरकार विसरू शकणार नाही. त्यांच्याकडे सकारात्मकपणे पाहिले जाईल. गोवा राज्य सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने लस टोचून घ्यावी. तिसऱया लाटेसाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत. सांगे येथील आरोग्य केंद इमारत बांधकामास आपल्या खात्याची कोणती अडचण नाही. 108 रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वांच्या कार्याचे कौतुक केले.
आरोग्य केंद्र इमारतीचे काम लवकर सुरू होण्याची गरज
आमदार प्रसाद गावकर यांनी सांगे आरोग्य केंद्र इमारतीचे काम लवकर सुरू होण्याची गरज व्यक्त केली. तसेच 108 रुग्णवाहिका असून ती दोन पाळय़ांमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रुग्णांसाठी डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी देवासमान असून रुग्णांना जीवनदान देण्याचे काम ते करतात अशा शब्दात त्यांच्या कार्याचे गुणगान केले. आरोग्य संचालक डॉ. जोस डिसा, कोरोना लसीकरणाचे राज्य नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर, सांगे पीएचसीच्या आरोग्याधिकारी डॉ. सीमा पै फोंडेकर, नगरसेवक रूमाल्डो फर्नांडिस, फौझिया शेख, संगमेश्वर नाईक व मेशू डिकॉस्ता हजर होते.
सर्व समस्यांवर मात करून आपण सारे इथपर्यंत पोहोचल्याचे डॉ. डिसा यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने लसीकरण यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. सीमा पै फोंडेकर, डॉ. मेधा कुडचडकर, डॉ. अमिता लोटलीकर, डॉ. शिल्पा केसरकर, डॉ. नवनाथ पंचवाडकर, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. नाईक, डॉ. स्वामिनी रायकर, डॉ. सुषमा गावस देसाई, डॉ. आदित्य नाईक, डॉ. गोपीनाथ चिथमरा, डॉ. भिसे, डॉ. तृप्ती, स्वच्छता निरीक्षक वासुदेव नाईक यांच्यासह एकूण 80 कोविड योद्धय़ांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन यतीन नाईक व इग्नेशस झेवियर यांनी केले, तर आभार डॉ. कुडचडकर यांनी मानले.
महत्त्वाचे म्हणजे या सरकारी कार्यक्रमाला सांगेच्या नगराध्यक्षा श्वेता नाईक तारी, उपनगराध्यक्ष कॅरोज क्रूझसह सत्तारूढ गटाचे इतर चार नगरसेवक गैरहजर राहिले. तर विरोधी गटाचे चारही नगरसेवक हजर राहिले व त्यांना व्यासपीठावर स्थान मिळाले. नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीबद्दल चर्चा सुरू झाली आहे.









