प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोविड महामारीमुळे अर्थव्यवस्था देखील नाजूक बनल्यानंतर कोविडशी सामना आणि अर्थव्यवस्थेची पुन्हा भरारी मारण्यापर्यंत मजल गाठणे ही खरेतर फार मोठी आणि मोलाची कामगिरी आपल्या सरकारकडून झाल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
डॉ. प्रमोद सावंत सरकारला सत्तेवर आल्यास आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त दै. तरुण भारत’शी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीय जनतेने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
वास्तविक आपले सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक संघर्षाना तोंड देत राहीले. त्यातल्या त्यात कोविड महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेली आर्थिक नाजूक परिस्थिती या दोन्हींमधून वाट काढताना दमछाक उडालेली खरी, परंतु सरकारने उत्तम प्रगती साध्य केली आहे. जनतेचे या सरकारला वेळोवेळी सहकार्य प्राप्त झाले आहे. सरकारने आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या योजनेसाठी होईल तेवढी मदत आणि सहकार्य केलेले असून त्यातून निश्चितच गोवा विकास क्षेत्रात उंच भरारी घेणार आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन वर्षाच्या सफल कारकिर्दीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला उद्देशून संदेश दिला आहे, त्यात त्यांनी जनतेला आजवर दिले तसेच सहकार्य करीत रहा आणि जे कोणी अफवा उठवित असतात अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. राज्यातील विकासासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे आणि गोव्याच्या विकासाबाबत आपण कधीही, कोणतीही तडजोड करीत नाही असे ते म्हणाले.









