प्रजासत्ताकदिनाच्या पुर्वसंध्येला राबवलेली मोहिम 12 तासात फत्ते : मावळ्यांमध्ये श्रेया व योगेश या सख्ख्या बहिण भावाचा समावेश
प्रतिनिधी / कोल्हापूर
गिर्यारोहकांच्या अंगातील साहसाची परिक्षा घेणारा आव्हानात्मक नैसर्गिक रचनेचा लिंगाणा सुळका येथील कोल्हापूर हायकर्सच्या 15 तरुण गिर्यारोहकांनी अतिशय संयमाने यशस्वीपणे सर केला. हायकर्सचे संस्थापक अध्यक्ष सागर पाटील, इंद्रजीत मोरे, विजय घोलप, श्रेया शेट्टी, योगेश शेट्टी, दीप्ती पाटील, शिवाजी राऊत, प्रताप सोनवणे, अनंत उंबरकर, सुदर्शन धनवडे, आबरार गवंडी, मुस्तफा कच्ची, वैभव सुतार, साद अगलावानी व मंगेश कुलकर्णी अशी लिंगाणा सुळका सर करणाऱ्या गिर्यारोहकांची नावे आहेत. देशाच्या 71 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पुर्वसंध्येला ही कामगिरी करुन दाखवली. ही कामगिरी करणाऱयांमध्ये श्रेया व योगेश शेट्टी या दोघा सख्ख्या बहिण-भावाचा समावेश आहे.
समुद्र सपाटीपासून 3 हजार फुट उंचीवर असलेला हा लिंगाणा सुळका दुर्गदुर्गेश्वर रायगडपासून पुर्वदिशेला 10 ते 15 किलो आंतरावर आहे. त्यापैकी प्रत्यक्षात सुळका सर करण्यासाठी 1 हजार फुट उंच (रॉक क्लायबिंग) चढाई करावी लागते. तत्पुर्वी गिर्यारोहकांना मोहरी गावातून बोराडेची नाळ उतरावी लागले. या नाळीतील प्रवासही तसा कठिण असतो. 25 जानेवारीला पहाटे साडे चार वाजता कोल्हापूर हायकर्सच्या 15 गिर्यारोहकांनी नाळ उतरुन लिंगाणावर चढाई करायला सुरुवात केली. चढाई करताना अनुचित प्रकार घडू नये यासाठी तांत्रिक साहित्यांचा वापर केला. अतिशय संयमाने एक एक पाऊल वर टाकत टाकत सायंकाळी 5 वाजता लिंगाणाच्या टोक्यावर प्रवेश करुन तेथे हायकर्स गिर्यारोहकांनी तिरंगा फडकवला. भारत माता की जय अशी घोषणा ही दिली. यानंतर ज्या संयमाने सुळक्यावर चढाई केली होती, त्याच संयमाने सर्व गिर्यारोहक दोरखंडाच्या (रॅपलिंग) सहाय्याने सुळक्यावरून नाळीत उतरले. या एकुणच साहसी कामगिरीसाठी इंद्रजीत मोरे व अनंत उंबरकर सर्वांना मार्गदर्शन लाभले. सायंकाळी सर्व गिर्यारोहकांना मोहरी गावचे सरपंच शिवाजी पोटे, प्रताप सोनवणे, सुदर्शन धानवड यांच्या सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.









