मराठा नेटकरी युवक, युवती आक्रमक : आरक्षण स्थगितीनंतरची खदखद, भावना व्यक्त : राजकीय नेत्यांवर जहाल शब्दात टीकास्त्र : एकजुटीचा मराठा समाजाला सल्ला
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळल्यानंतर राज्यातील मराठा समाजात प्रचंड खदखद निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरून नेटकरी मराठा युवक, युवती आपल्या भावना, रोष जहाल शब्दात व्यक्त करताना दिसत आहेत. राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे मराठय़ांची एक पिढी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. मराठय़ांनो आता तरी जागे व्हावा, शहाणे व्हावा असा सल्ला देताना राजकीय नेत्यांबरोबर मराठा खासदार, आमदारांबद्दलही तीव्र संताप व्यक्त व्यक्त होताना दिसत आहे.
दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात लाखोंचे मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले होते. मराठा समाजाच्या मूक एल्गारापुढे फडणवीस सरकारही झुकावे लागले होते. त्या सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण त्यावर झालेल्या अपिलात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे मराठा आरक्षणाचा लाभ मिळणारे मराठा युवक, युवती, विद्यार्थी अडचणीत आले आहेत. त्यांचे भवितव्य अंधारात लोटले गेले आहे,अशी भावना मराठा समाजातून व्यक्त होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर संतप्त भावना आणि सल्ला
आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर सोशल मीडियावर मराठा युवक, युवती, विद्यार्थी यांच्यासह मराठा संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या भावना तीव्र शब्दात मांडू लागले आहेत. या भावनांना कॉमेंटस् आणि लाईकही प्रचंड प्रमाणात मिळू लागले आहेत. काहींनी जहाल शब्दात आपल्या भावना मांडल्या आहेत. काहींनी मार्मिक अशा तर काहीनी सल्ला देणाऱया कॉमेंटस् केल्या आहेत.
त्यातील काही बोलक्या, बहुचर्चित कॉमेंटस् अशा :
मराठा आमदार, खासदारांना भावपूर्ण श्रद्धांजली, मराठा आरक्षणाला स्थगिती दोषी कोण? राज्य सरकार की केंद्र सरकार?, नेमक…. कुणी खाल्ले?, जो पर्यंत मराठा आरक्कण नोकरीमध्ये लागू होत नाही तो पर्यंत ही नोकर भरती नको, आरक्षण मिळत नाही तो पर्यंत किती मराठे ‘नोटा’ दाबणार?, आरक्षण, दबावतंत्र नोटा, मराठा मुलांच भविष्य टांगणीला हय़ाला जबाबदार कोण?, मराठा क्रांती मोर्चा … पुन्हा एकदा….! तुम्ही सामील होणार ना…?, या देशात जाळपोळ आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱया लोकांना न्याय मिळतो मात्र लाखोंचे शांततेत मोर्चे काढणाऱया मराठय़ांवर मात्र अन्याय होतो, शांत आहे म्हणून अंत पाहू नका मराठे पुन्हा उसळणार!, आता तरी सर्व एकत्र येणार का?
युवराज संभाजीराजेंना साकडे
सोशल मीडियावर सर्व राजकीय पक्षांच्या नेते, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींवर मराठा युवक, युवतींनी टीकेची झोड उठविली असली तरी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना मात्र साकडे घातले आहे. संभाजीराजे यांनी महाराष्ट्र आणि मराठा बांधव एक करावा, अशी साद काही मराठा युवकांनी घातली आहे. इतर जातींना …. नेते आहेत. आमचे दैवत संभाजीराजे, अशी कॉमेंट मावळा परिवाराने करताना संभाजीराजेंनी मराठय़ांसाठी आता पुढाकार घ्यावा, मराठय़ांचे नेतृत्व करावे, अशी भावना व्यक्त केली आहे.