प्रसुती, भूलतज्ञांसह ऑर्थोपेडिक डॉक्टरांचे मानधन थकले, महापालिका प्रशासनाचा आंधळा कारभार
वर्षभर अधिकाऱ्यांच्या टेबलवरून फाईलचा प्रवास, गोरगरीब, सर्व सामान्य रुग्णांना फटका बसणार
संजीव खाडे / कोल्हापूर
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या पॅनेलवरील १७ डॉक्टरांचे सुमारे ३५ लाख रुपये मानधन वर्षभर थकले आहे. वारंवार विनंती अर्ज, पत्रव्यवहार करुनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे सर्व डॉक्टर संतप्त झाले आहेत. ७ फेब्रुवारीपर्यंत थकीत मानधन मिळाले नाही तर शस्त्रक्रिया बंद करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे पंचगंगा हॉस्पिटल आणि सावित्रीबाई फुले रुग्णालयातील शस्त्रक्रिया थांबण्याची भीती आता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागात शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पॅनेल आहे. या पॅनेलवर पाच प्रसुतीतज्ञ ५ (गायनॉकॉलॉजिस्ट) भूलतज्ञ ९ (ऍनास्थेशिया तज्ञ), अस्थीरोगतज्ञ ३ (आर्थोपेडिक तज्ञ) असे सुमारे १७ डॉक्टर आहेत. ते पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देतात. सर्वसाधारणपणे शस्त्रक्रियेच्या संख्येनुसार महापालिकेकडून मानधन दिले जाते. पूर्वी दिवसाला एक दोन शस्त्रक्रिया होत असत मात्र काही महिन्यांपासून दररोज विविध प्रकारच्या पाच ते दहा शस्त्रक्रिया होतात. त्यामध्ये सिझेरियनची संख्या जास्त असते. गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना या वैद्यकीय सेवेचा लाभ होतो.
महापालिका प्रशासनाचा आंधळा कारभार
पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामध्ये पॅनेलवरील डॉक्टरांचे योगदान तीन वर्षे महत्त्वाचे ठरले आहे. कोरोनाच्या संकटकाळात तर या डॉक्टरांनी लाखमोलाचे काम केले. दरम्यान, या डॉक्टरांना गत वर्षीच्या फेब्रुवारीपासून मिळणारे मासिक मानधन बंद झाले आहे. मानधन मिळावे, यासाठी आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पण, निधी असूनही तांत्रिक कारण सांगून मानधनाच्या यादीची फाईल, प्रशासनात अडकून पडली असल्याचा आरोप पॅनेलवरील एका डॉक्टरने केला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या टेबलवरून मानधनाची फाईल फिरत आहे.
कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक म्हणून आंधळे नामक अधिकारी कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर वर्षा परीट या नवीन अधिकारी आल्या. त्यांच्याकडूनही कार्यवाही झाली नाही. आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागी डॉ. पोळ आले. त्यांच्याकडूनही अपेक्षित पाठपुरावा झाला नाही. उपायुक्त निखिल मोरे यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतरही फाईल पुढे सरकली नाही, अशी व्यथा डॉक्टरांनी मांडली. मानधन थकल्यानंतरही पॅनेलवरील डॉक्टरांनी आपली सेवा सुरू ठेवली आहे. पण वारंवार विनंती केल्यानंतरही मानधन मिळत नसल्याने त्यांनी आता यापुढे शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत जर थकीत मानधन मिळाले नाही तर त्यानंतर शस्त्रक्रिया करणे बंद केले जाईल, असा इशारा शुक्रवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन देण्यात येणार आहे, असे पॅनेलवरील डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणाबद्दल आरोग्य अधिकारी डॉ. पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही, त्यामुळे त्यांचे प्रतिक्रिया समजू शकली नाही.
‘त्या’ महिलेची सावित्रीबाई फुलेतील शस्त्रक्रिया थांबली सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये एका महिलेची खुब्याची शस्त्रक्रिया होणार होती पण भूलतज्ञ उपलब्ध न झाल्याने शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. ही महिला 5 जानेवारीला हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. तिला आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रियेसाठी निधी मंजूर झाला. पण, महापालिका प्रशासनाने मानधन थकविण्याच्या प्रकाराचा या महिलेला फटका बसला आहे. |