बैठकीला खासदार धैर्यशील मानेंची उपस्थिती
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर व सांगली या दोन्ही जिल्ह्यांत महापुराच्या तडाख्याने मोठी हानी झाली होती. पूरग्रस्त शेतकरी बांधव, नागरिक, व्यावसायिक व मजूर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खासबाब म्हणून मागण्यांना मंजुरी द्यावी, यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता. त्याबाबतची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली.
या बैठकीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव सिताराम कुंटे, विकास खारगे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव हासिन गुप्ता हे उपस्थित होते.
दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदार संघात येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा व इतर छोट्या मोठ्या नद्यांच्या महापुराने २००५ पासुन सातत्याने नदीकाठावरील गावांचे नुकसान होत आहे. यामध्ये शेतीसह पशुधन, प्रापंचिक साहित्ये मोठ्या नुकसान झाले आहे. कोरोना महामरीमुळे मुळातच आर्थिक संकटात आलेल्या नागरिकांचे पुन्हा महापुराने जणू कंबरडेच मोडले आहे. तेव्हा यांचे जिवन सुसह्य करण्यासाठी माने यांनी २० आँगस्ट पासुन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु केला होता.