महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांची माहिती, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत 860 शाळा, महाविद्यालयांकडून बारावीचा अंतिम निकाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. हा निकाल कोल्हापूर विभागीय मंडळाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडे सबमिट केला आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
राज्य शासनाने दिलेल्या सुत्रानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हÎातील 860 शाळा, महाविद्यालयांनी 1 लाख 22 हजार 534 विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत तयार केला. विभागीय मंडळानेही निकालातील त्रुटींची दुरूस्ती करून निकाल राज्य मंडळाकडे सादर केला आहे. कोरोना आणि महापूर या दोन्ही संकटांचा सामना करीत शाळा, महाविद्यालयांनी वेळेत निकाल पूर्ण केल्याबद्दल विभागीय मंडळाकडून समाधान व्यक्त होत आहे. राज्य मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेला जोर येणार आहे. तसेच नीट परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांचाही मार्ग मोकळा होणार आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बारावी निकाल
बारावीचा निकाल तयार करण्याची लगबग राज्यातील सर्व विभागीय मंडळात सुरू आहे. सर्व विभागीय मंडळाकडून निकालाचे काम पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
बारावीचे विद्यार्थी जिल्हानिहाय
जिल्हा शाळा, महाविद्यालय विद्यार्थी संख्या
कोल्हापूर 317 51760
सांगली 279 33553
सातारा 264 37215
एकूण 860 122534