वार्ताहर/हुपरी
हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथे ग्रामपंचायत सदस्याने सरपंच यांना डिझेल-पेट्रोल तेलाच्या खरेदीत गैरप्रकार केला असल्याचा खोटा बोबाटा गावभर करून आमची बदनामी का करत आहात असा जाब विचारला असता दोघांत ग्रामपंचायत कार्यालयात हमरीतुमरी होत एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडला. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चिन्ह दिसत आहे.
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव पसरला असून केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. सर्व ग्रामपंचायतीना 14 वित्त आयोग निधी त्यावरील व्याज, इतर खात्यातून आलेला निधी व ग्रामपंचायतीचा स्वनिधीची रक्कम कोरोना टाळण्यासाठी प्रतिबंध उपाय करण्यासाठी खर्च करण्याचा जी. आर (आदेश) दिला आहे. असे असताना सरपंच कोरोना प्रतिबंध करण्यासाठी कोणतेही ठोस उपाययोजना राबविण्यास नकार देत आहेत. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत 13 सदस्यांनी बंड पुकारून सरपंचना वगळून कोरोना दक्षता समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून गावातून चार वेळा औषध फवारणी, मास्क वाटप, कोरोना प्रतिबंधक उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे सरपंच यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरनिधी खर्च करणे गरजेचे आहे परंतु एकमेकांच्या हट्टीपणामुळे सरपंच व सदस्यांच्यात दुफळी निर्माण झालेचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
एका सदस्यांने स्वमालकीची गाडी, फवारणी यंत्र खरेदी करून वेळ देऊन कार्य करीत असताना औषध फवारणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या पेट्रोल-डिझेल खर्चात गैरव्यवहार झाल्याची खोटी बदनामी सरपंच गावभर करत आहेत. हा राग मनात धरून सदस्याने सरपंचांना ग्रामपंचायत कार्यालयात जाब विचारला असता जोरदार खडाजंगी झाली. त्यावेळी एकेरी भाषा वापरत एकमेकांवर तांब्या व पाण्याची बाटली फेकण्याचा प्रकार घडला. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.