प्रतिनिधी / कोल्हापूर
इंधन दरवाढीच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मध्यवर्ती बस स्थानकाजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली. भाकपचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
भारतात पेट्रोल, डिझेलच्या वाढ होण्यामागचे प्रमुख कारण काय? असा सवाल सतीशचंद्र कांबळे यांनी केला. ते म्हणाले, खरंतर पेट्रोल, डिझेलचा दर कमी आहे. मात्र त्यापेक्षा त्यावरील करांचं प्रमाण जास्त आहे. वाहतूक खर्च, डीलरचं कमिशन, केंद्राकडून आकारण्यात येणारं उत्पादन शुल्क आणि व्हॅट यांच्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होते. पेट्रोलच्या दरातील करांचा वाटा 60 टक्के आहे. तर डिझेलच्या बाबतीत हे प्रमाण 55 टक्के इतकं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम शपथ घेतली त्यावेळी पेट्रोलचे दर 71 रुपये 14 पैसे व डिझेलचे दर 56 रुपये 71 पैसे होते.
तेच आता पेट्रोलचे दर 107 रुपये आणि डिझेलचे दर 100 रुपये झालेले आहेत. नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यावर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा दर 110 अमेरिकन डॉलर होता. आता तो 65 अमेरिकन डॉलर झालेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होऊन देखील कर वाढवल्यामुळे पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. पेट्रोलचे उत्पादन शुल्क 19 रुपये 98 पैसे वरून 32 रुपये 98 पैशांवर नेले आहे. तर डिझेलचे उत्पादन शुल्क 15 रुपये 83 पैशांवरून 31 रुपये 83 पैशावर नेले आहे. त्यामुळे ही दरवाढ नरेंद्र मोदी सरकार निर्मित आहे. असा आरोप कांबळे यांनी केला. सह सेक्रेटरी कॉम्रेड नामदेव गावडे, शहर सेक्रेटरी कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नामदेव पाटील, दिलदार मुजावर, शिवाजी माळी, मधुकर माने, मुस्ताक शेख, सागर टोपले, गणेश गर्दे, प्रशांत आंबी, भारत चौगुले, भिकाजी शिंदे, दिलीप सावंत, राजू नायकवडे, नागेश ढोकरे, एस. एम. पाटील, सदाशिव पाटील, अरुण देवकुळे, उत्कर्ष पवार, अतुल कवाळे, रियाज मुजावर आदी उपस्थित होते.









