मृत महिला, पुरूष हातकणंगले तालुक्यातील, मृतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले मिरजेला
प्रतिनिधी/कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये बुधवारी हातकणंगले तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. दोघांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ते तपासणीसाठी मिरजेला पाठवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, इचलकरंजी येथील पुरूषाचा मृत्यू सारीने झाल्याची शक्यता आहे. कोरोना वॉर्डमध्ये आजपर्यत 30 संशयितांचा मृत्यू झाला, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये इचलकरंजी गणेशनगर येथील 45 वर्षांचा पुरूष मंगळवारी रात्री दाखल झाला होता. त्याला श्वसन घेताना त्रास होत होता. कोरोना वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला आहे. ऍक्युट रिस्पेऍरीटरी फेल्युअर अर्थात श्वसनविकाराने त्याचा मृत्यू झाला. त्याला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने ‘सारी’ची लक्षणे दिसून आल्याने, सारीने त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. चार दिवसांपुर्वी शाहूवाडी तालुक्यात सारीचा रूग्ण आढळला होता. त्याचाही स्वॅब घेतला आहे. त्याचा अहवाल अद्यापी आलेला नाही.
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज दुर्गेवाडी येथील 27 वर्षीय तरूणी मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता सीपीआर कोरोना वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल झाली. तिचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. छातीत दुखू लागल्याने, छातीतील जंतूसंसर्गाने तिचा मृत्यू झाला आहे. तिचाही स्वॅब घेतला असून तो तपासणीसाठी पाठवला आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये बुधवारी 61 जणांची तपासणी केली, तसेच नवीन 24 रूग्ण दाखल झाले. सध्या आयपीडीत 131 जणांवर उपचार सुरू आहेत. सात पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सीपीआर कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू झालेल्या 30 जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. एका मृताचा स्वॅब नाकारला आहे. अन्य तिघांच्या मृत्यूचे स्वॅब रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली.