प्रतिनिधी / कोल्हापूर
खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्या कोरोना रुग्णांची बिले विमा कंपन्यांनी त्वरीत द्यावीत, सर्व आय.सी.यु.च्या युनिटमध्ये असणार्या सी.सी.टी.व्ही. पॅमेर्याद्वारे दर एक तासाने रुग्णाची स्थिती बाहेरील रुममध्ये नातेवाईकांना दाखविण्याची व्यवस्था करावी.यासह विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.
कृती समितीचे निमंत्रक रमेश मोरे व अशोक पोवार यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. निवेदनातील मागण्या अशा, सर्वच खाजगी रूग्णालयांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे तज्ञ प्रशिक्षित स्टाफ व आय.सी.यु. युनिट कार्यरत आहेत का याची चौकशी व्हावी, कोणत्याही रुग्णालयाच्या दर्शनी भागामध्ये उपचाराचे दरपत्रक (उदा. रुम भाडे, नर्सिंग चार्जेस, आय.सी.यु.भाडे) लावलेले नाहीत ते त्वरीत लावावेत, रुग्णालयामध्ये असणार्या औषध दुकानांमधूनच रुग्णांना औषधे घेण्याची सक्ती करु नये, सर्व रुग्णालयामध्ये शासकीय दराप्रमाणे बील आकारणी करुन शासकीय लेखापरिक्षकाकडून बिल तपासणी करुनच पैसे भरुन घ्यावेत, सर्वात जास्त कोरोना मृत्यु कोल्हापूर जिह्यात आहेत त्याचे ‘डेथ ऑडीट’
त्वरीत करुन जनतेसमोर जाहीर करावे, रुग्णालयाच्या सल्यानुसार घरी उपचार घेणार्या रुग्णांची बिले विमा कंपन्यांकडून दिली जात नाहीत, ती त्वरीत देण्यास सांगावे.याची त्वरीत नोंद घेऊन कार्यवाही करावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरुन उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी रुग्णालये व प्रशासनाची राहील. शिष्टमंडळात भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, प्रमोद पुंगावकर, राजेश वरक, अंजुम देसाई, लहुजी शिंदे, विजय पोळ आदींचा समावेश होता.