जिह्यातील अनेक गावांमधील स्थिती
प्रशासन अनभिज्ञ,नागरिकांची कुचंबना
प्रतिबंधीत क्षेत्रामधून जाणाऱया मुख्य रस्त्यांवरही पोलिसांकडून अडवणूक
कृष्णात चौगले / कोल्हापूर
गेल्या महिन्याभरात शहरांबरोबरच ग्रामीण भागाच्या कानाकोपर्यापर्यंत कोरोना महामारीचे लोण पसरले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणेबरोबरच ग्रामदक्षत्या समित्यांकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाचा बहुतांशी भार हलका झाला आहे. पण जिल्ह्याच्या काही गावांमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतरही अख्ख गाव लॉकडाऊन केले जात आहे. यामध्ये मोठय़ा बाजारपेठा असणार्या अनेक गावांचा समावेश आहे. यापैकी काही गावातून प्रमुख राज्यमार्ग जातात. अशा ठिकाणी लॉकडाऊनचे कारण पुढे करून पोलिसांकडून राज्यमार्गच अडवले जात आहेत. व्यापारपेठ असलेल्या अनेक गावांत वारंवार लॉकडाऊन केले जात असल्यामुळे तेथील व्यवसायिकांसह हातावरचे पोट असलेल्या नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे. प्रशासनाकडूनही ‘नरोवा कुंजरोवा’ची भूमिका घेतली जात असल्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
‘गाव करील ते राव करील काय?’ ही म्हण प्रचलित आहे. एखादा निर्णय घ्यायचा आणि तो कोणत्याही परिस्थितीत तडीस लावायाचा यासाठी ग्रामस्थ नेहमी आग्रही असतात. मग त्यासाठी प्रशासनाच्या मदतीची प्रतिक्षा देखील ते करत नाहीत. त्यामुळे आजही गावगाडा सक्षमपणे सुरु असून प्रशासकीय निर्णय राबविण्यासाठी त्याचा मोठा फायदा होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यात ग्रामसमित्याकडून चांगले काम सुरु आहे. प्रशासनाने ग्रामदक्षता आणि प्रभाग समित्यांना विशेष अधिकार दिले आहेत. त्यामुळे गावपातळीवर काय निर्णय घ्यायचा याबाबत ग्रामसमित्याच धोरण निश्चित करत आहेत आणि त्यानुसार अंमलबजावणी सुरु आहे.
गेल्या पंधरा दिवसांत जिह्यात कोरोनाचा सामुहिक संसर्ग झाला आहे. त्यामुळे एका-एका गावात 40 ते 50 कोरोनाबाधित सापडत आहेत. ज्या गावांत खरोखरच सामुहिक संसर्गजन्य स्थिती आहे, त्या गावांत काही दिवस लॉकडाऊन करणे आवश्यकच आहे. पण जेथे 1 ते 2 रूग्ण सापडत आहेत, अशी मोठय़ा बाजारपेठांची गावेही 7 ते 15 दिवस बंद केली जात आहेत. तेथील सर्व व्यवहार बंद ठेवले जात आहे. 20 ते 25 हजार लोकवस्ती असलेल्या या गावांमध्ये ज्या गल्लीत कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे, तेवढाच परिसर प्रतिबंधित न करता संपूर्ण गावच प्रतिबंधित केले जात आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिक, व्यापारी उद्योजकांसह मोलमजूरी करण्याऱया नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावे व्यापारपेठ असलेल्या गावांशी निगडीत असतात. जीवनावश्यक वस्तूंसह इतर कृषीपूरक साहित्य अशा गावांतूनच त्यांना खरेदी करावी लागतात. पण कोणताही विचार न करता ग्रामसमित्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाची शिक्षा मात्र ग्रामस्थांना भोगावी लागत आहे.
कळे पोलिसांनी अडवली राज्यमार्गावरील वाहतूक
पन्हाळा तालुक्यातील कळे गावामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तीच्या गल्लीचा परिसर प्रतिबंधित करण्याऐवजी प्रशासनाने अख्खे गावच लॉकडाऊन केले आहे. या गावामधून प्रमुख जिल्हामार्ग व राज्य मार्ग जातात. वास्तविक गाव लॉकडाऊन केले असले तरी हे मार्ग सुरु ठेवणे आवश्यक आहे. पण स्थानिक पोलिसांकडून या रस्त्यावरील वाहतूकच काही काळ अडवण्याचा प्रयत्न केल्याच्या वाहनधारकांच्या तक्रारी आहेत. मालवाहू गाडय़ांतील चालकांनी तीव्र विरोध केल्यानंतर त्यांना सोडले जात होते. पण अनेक वाहनधारकांना दोन ते तीन तासांच्या प्रतिक्षेनंतर सोडण्यात आले. काही नागरिकांनी कोल्हापूरातील हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणीसाठी मंगळवारी अपॉईन्टमेंट घेतली होती. त्यांनाही पोलीसांनी कोल्हापूर-गगनबावडा रोडवरून सोडले नाही. अखेरीस पुनाळ-पडळ-कोपार्डेमार्गे त्यांना कोल्हापूरला जावे लागले. त्यामुळे कोरोनाच्या दहशतीखाली असलेल्या नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.
प्रथम संपर्कातील नागरिकांच्या स्वॅबच्या अहवालानंतर आदेशात बदल
कळे गावामधील एक कोरोना बाधित व्यक्तीच्या प्रथम संपर्कात 14 व्यक्ती आल्या आहेत. त्या सर्वांचे मंगळवारी स्वॅब तपासणीसाठी दिले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये किती जण कोरोना पॉझिटीव्ह आहेत, याची माहिती घेऊन ते ज्या गल्लीत राहतात, तेवढय़ाच गल्ल्यांमध्ये प्रतिबंधीत क्षेत्र केले जाईल. त्यामुळे सध्या 3 ऑगस्टपर्यत प्रतिबंधीत क्षेत्र करण्याचे आदेश असले तरी त्यामध्ये बुधवारी बदल करण्यात येईल. तसेच पोलिसांनी राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक रोखू नये याबाबत सूचना दिल्या जातील.
अमित माळी – प्रांताधिकारी पन्हाळा-शाहूवाडी








