कृष्णात चौगले / कोल्हापूर
गेल्या चार दिवसांत कोल्हापूर जिह्यात कोरोनाबाधितांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. करवीर तालुक्यासह कोल्हापूर शहरात बाधितांची संख्या सर्वाधिक असून काही प्रभाग हॉटस्पॉट बनले आहेत. लक्षणे दिसणाऱ्या दररोज सुमारे एक हजार पाचशेहून अधिक नागरिकांची कोविडची तपासणी केली जात आहे. यामध्ये 1 ते 4 एप्रिल या कालावधीत तब्बल 638 नागरीकांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक निर्बंध घातले जात आहेत.
कोरोनाची पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर राज्यात नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याच्या कालावधीत कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात होते. पण फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून पुन्हा बाधितांची संख्या वाढत असून दुसऱया लाटेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. सध्या राज्यातील इतर जिह्यांच्या तुलनेत कोल्हापूरातील संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात असले तरी त्यामध्ये मोठÎा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णसंख्येचा विचार करता जानेवारीमध्ये 431, फेब्रुवारीत 601, मार्चमध्ये 1615 तर 1 ते चार एप्रिलदरम्यान तब्बल 638 नागरीकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या आठवडÎाभरात 10 हजार 595 जणांची कोरोना तपासणी केली असून त्यामध्ये 908 नागरीकांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जानेवारी ते 4 एप्रिलअखेर जिह्यात एकूण 3 हजार 259 नागरीकांना कोरोना संसर्ग झाला आहे.
दहा दिवसांत 1 हजार 86 रुग्ण पॉझिटिव्ह
गेल्या 10 दिवसांत जिह्यात एकूण 1 हजार 86 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यामध्ये आजरा 25, भुदरगड 30, चंदगड 01, गडहिंग्लज 36, गगनबावडा 01, हातगणंगले 79, कागल 21, करवीर 152, पन्हाळा 20, राधानगरी 12, शिरोळ 16, नगरपालिका क्षेत्रांमध्ये 181, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र 327 तर इतर जिह्यातून कोल्हापूरात आलेले 166 रूग्ण बाधित आढळले.
लसीकरणासाठी आवश्यक डोस उपलब्ध
लोकसंख्येच्या तुलनेत कोविड लसिकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिह्यात 15 लाख 91 हजार 517 कोरोना लसीचे डोस देण्याचे उद्दीष्ट आहे. यामध्ये 3 लाख 94 हजार 332 जणांना पहिला डोस दिला आहे. तर 24 हजार 718 नागरीकांना दुसरा डोस दिला आहे. या लसिकरणासाठी जिह्यात 5 लाख 20 हजार डोस प्राप्त झाले आहेत. यामध्ये आजतागायत दिलेले डोस वजा करता सुमारे 70 हजार डोस शिल्लक असून सोमवारी रात्री आणखी 50 हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी आवश्यक डोस उपलब्ध असल्याचे चित्र आहे.
ट्रेसिंग, टेस्टींग अत्यावश्यक
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता दुसरी लाट उंबरठ्यावर आली आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर आदी दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. राज्यातील काही जिह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र आहे. त्या ठिकाणी दिवसा एक हजार कोरोनाबाधित रुग्ण निदर्शनास येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिह्यातील नागरीकांनी आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास येथेही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास वेळ लागणार नाही. ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आढळतात, तेथे आरोग्य कर्मचाऱयांनी ट्रेसिंग आणि टेस्टींगसाठी आग्रही राहणे महत्वाचे आहे.
ग्रामदक्षता समित्यांनी पुन्हा सक्षमपणे काम करणे आवश्यक कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रत्येक गावात स्थापन केलेल्या ग्रामदक्षता समित्यांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अत्यंत महत्वाचे काम केले. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सखोल चौकशीसह त्याची तपासणी करूनच गावात एन्ट्री दिली जात होती. त्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे शक्य झाले. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे ग्रामदक्षता समित्यांनी पुन्हा सक्षमपणे काम करणे आवश्यक आहे. डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.कोल्हापूर |