अठरा दिवसापासून आव्हानात्मक बनलेल्या खूनातील अज्ञाताची ओळख पटविण्यास पोलिसांना यश
राजेंद्र होळकर / इचलकरंजी
शहरातील शांतीनगर परिसरात २४ फेब्रुवारी झालेल्या खून झालेला युवक मुंबईचा असल्याचे पोलीस तपास पुढे आले. अजय कांबळे (रा. मुंबई) असे मृत युवकाचे नाव आहे. या खून प्रकरणाचा छडा लावीत रेकॉर्डवरील एका गुन्हेगारासह तिघांच्या पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास मुसक्या आवळल्या. गुन्हेगार अजय कमतनुरे, तेजस गोरे, शक्ती इंगळे (सर्व रा. शहापूर, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहे. या तिघांना पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्यासह त्यांच्या कार्यालयाच्या विशेष पथकातील पोलीस अमंलदार सुरेंद्र वळवी, पोलीस नाईक सुनिल पाटील, सुहास शिंदे, कॉन्स्टेबल मोहसिन पठाण, प्रदीप पाटील आदिच्या पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करुन पकडले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
संशयित आरोपीने अत्यंत शांत डोक्याने मुंबईच्या या युवकाचा खून केला होता. तसेच या युवकांची ओळख पटू नये, यासाठी त्यांनी त्यांचा चेहरा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला होता. त्यामुळे त्यांची ओळख पटवून त्यांच्या मारेकऱ्याचा शोध कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाबरोबर गावभाग, शिवाजीनगर, शहापुर, या तीन पोलीस ठाण्याच्या तपासी पथके आणि पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या कार्यालयाचे विशेष पथकाकडून सुरु होता. तरी देखील गेली १७ दिवस तपास पोलीस पथकाना यश येत नव्हते. अखेर या खुनाचा छडा लावण्यास पोलीस उपाअधीक्षक महामुनी यांच्या विशेष पोलीस पथकाला यश आले. या पथकाला या खून प्रकरणी रेकॉर्डवरील एका गुन्हेगारासह तिघांच्या मुसक्या आवळण्यास रविवारी पहाटेच्या सुमारास यश मिळाल्याची माहिती सुत्रांकडून समजते.









