प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरसह राज्यातील 7 जिल्हय़ात अद्यापी कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. जिल्हय़ाला पॉझिटिव्हीटी रेट अद्यापी कमी आलेला नाही. तो चौथ्या टफ्फ्यातच आहे. त्यामुळे निर्बंध राहणारच.. व्यापारी, उद्योजकांनी आणखी काही दिवस सहकार्य करावे, असे आवाहन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. याचवेळी शेजारील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ात डेल्टा फ्लसचे रूग्ण दिसून आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरला अधिक धोका आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सुचना दिल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी कोराना आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार आदी उपस्थित होते. आढावा बैठकीची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्हय़ाचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 6 टक्क्यांइतका आहे. आपण टेस्ट वाढवल्या आहेत. त्यामुळे दोन दिवसांत रूग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. आणखी काही दिवस रूग्णसंख्या वाढणार आहे. पण आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याने त्यावर नियंत्रण ठेवून आहोत. रूग्ण वाढल्याने जिल्हा अद्यापी चौथ्या टफ्फ्यातच आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांनी आणखी काही दिवस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग या शेजारील जिल्हय़ांत कोरोना डेल्टा फ्लसचे नवे रूग्ण दिसून आले आहेत. कोल्हापूरशी या भागाचा असलेला संपर्क आणि जिल्हाबंदी नसल्याने कोल्हापूरला डेल्टा फ्लस या म्युटेशनचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाला सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. तिसऱया लाटेचा संभाव्य धोका आहे. तो थोपवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाची पहिली लाट कोल्हापुरात उशिरा आली. दुसऱया लाटेबाबत हेच घडले आहे. दुसरी लाटही दोन महिने उशिरा कोल्हापुरात आली आहे. गेली दीड वर्षे आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे ही लाटही लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अँटीजेन कीटच्या सदोषतेची तपासणी करा : मंत्री मुश्रीफ
अँटीजेन टेस्टसंदर्भात तक्रारी आल्याने ही कीट सदोष आहेत काय, याची तपासणी करा, अशी सुचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिल्या. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली आहे. मात्र अनेकदा अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह तर आरटीपीसीआर निगेटिव्ह येत आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारांमुळे काहींना 14 दिवस कोरोंटाईन रहावं लागत आहे. त्यामुळे अँटीजेन किट सदोष आहेत का, याची तपासणी करण्याची सूचना केल्याचे सांगितले.
Previous Articleआयशर टेम्पो अडवून चोरट्यांनी लुटला ९८ हजारांचा माल
Next Article परत येतो,.. सांगणारे आईवडील पुन्हा दिसलेच नाहीत..!









