रजतकुमार ओसवाल तब्बल पाच हजार किलोमीटरचा रोमांचकारी प्रवास रिक्षाने करणार
सुधाकर काशीद / कोल्हापूर
रिक्षातून आपला प्रवास जास्तीत जास्त किती? एसटी स्टँड ते घर, किंवा वैयक्तिक कामासाठी तास-दोन तासांची सफर. पण कोल्हापुरातला एक तरुण कोल्हापूर ते मनाली व परत कोल्हापूर असा तब्बल पाच हजार किलोमीटरचा रोमांचकारी प्रवास रिक्षाने करणार आहे. यानिमित्ताने कोल्हापूरची रिक्षा हिमाचल प्रदेशातील धवलादार पर्वतरांगांच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. रजतकुमार ओसवाल (वय 35) या प्रतिभा नगरातल्या तरुणाने या साहसी मोहिमेचे नियोजन केले आहे. त्याच्यासोबत या प्रवासात डॉ. नम्रता सिंग सहभागी होणार आहेत.
येत्या 20 डिसेंबरला कोल्हापुरातून या मोहिमेची सुरुवात होणार आहे. प्रवासासाठी रिक्षा तर सज्ज झाली आहे. पण या रिक्षाची सज्जता आजमावण्यासाठी रजतकुमार याने कोल्हापूर महाबळेश्वर कोल्हापूर ही मोहीम चार-पाच दिवसापूर्वी पूर्ण केली आहे. प्रवास पर्यटन याची अलीकडे खूप मोठी क्रेझ आहे. पण रजकुमार ओसवाल यांच्या डोक्यात रिक्षातून पर्यटन ही संकल्पना घर करून होती. त्याने ही संकल्पना प्रत्यक्ष उतरविण्याचे ठरविले. त्यासाठी रिक्षासाठी ऑल इंडिया परमिट घेतले. कोल्हापुरात सन्मान गॅरेज व उमर भाई मिस्त्राr यांच्याकडून रिक्षाच्या भक्कम तेची कामे करून घेतली. प्रवास केवळ व्यवस्थित नव्हे तर आरामदायी व्हावा म्हणून बैठक व्यवस्था चांगली केली. वाय फाय, बॅटरी, कॅमेरा अशा अत्याधुनिक सुविधाने ही रिक्षा सज्ज केली.
या मोहिमेला त्यांनी निसर्ग वाचवा संकल्पनेची जोड दिली आहे. तर डॉक्टर नम्रता सिंग यांनी मार्गातील छोट्या छोट्या गावात स्तनाच्या कर्करोगाबद्दल महिला जागृती करण्याचे ठरवले आहे. त्यांचा हा प्रवास कोल्हापूर, पुणे, मुंबई, सुरत, वडोदरा, जयपूर, उदयपूर, जोधपूर, जैसलमेर, अजमेर, दिल्ली, चंदीगड, मनाली, डेहराडून, हरिद्वार, आग्रा ते परत कोल्हापूर असा असणार आहे. हा प्रवास साधारण तीस दिवसाचा असणार आहे. संपूर्ण प्रवासाचे चित्रीकरण ते या रिक्षाला बसवलेल्या खास कॅमेराद्वारे करणार आहेत.
रिक्षाप्रवासाचे आकर्षण
मी मनालीला विमानाने, खास गाडीने सहज जाऊ शकतो. पण सर्वसामान्यांच्या प्रवासाचा आधार असलेली रिक्षा मी मुद्दाम या प्रवासासाठी निवडली. डॉ. नम्रता सिंग या मोहिमेसाठी तयार झाल्या. हा प्रवास निश्चितपणे आम्ही यशस्वीपणे पूर्ण करु. परदेशी पर्यटकांना भारतातील रिक्षा प्रवासाबद्दल खूप आकर्षण आहे. ते भारतात येऊन रिक्षा पर्यटन करतात. आपण भारतात राहून भारतात रिक्षाचे पर्यटन का करू नये, या हेतूने मी या रोमांचकारी प्रवास मोहिमेचे आयोजन केले आहे.
-रजतकुमार ओसवाल









