लसीकरणाच्या अपयशाला मंत्र्यासह प्रशासन कारणीभूत ः भाजपचा आरोप, शहरात रूग्णसंख्या वाढत असताना लसीकरणात घट ः नगरसेवक अजित ठाणेकर यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गेल्या सप्ताहभरात कोरोना रूग्ण वाढत असताना लसीकरणात घट झाली आहे. अन्य जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी वाढत असताना कोल्हापुरात लसीचा तुटवडा आहे. याला जिल्ह्यांतील मंत्र्यांसह प्रशासन कारणीभूत आहे. आठ दिवसांत लसीचा पुरवठा न वाढल्यास आरोग्य राज्यमंत्र्यांसह, मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उपोषणाचा इशारा मंगळवारी भारतीय जनता पक्षाने दिला.
येथील दसरा चौकातील प्रेस क्लबमध्ये भारतीय जनता पक्षाने आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील लसीकरणाची वस्तुस्थिती मांडली. पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक अजित ठाणेकर, अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, दिलीप मैत्राणी उपस्थित होते.
नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, जानेवारीपासून जिल्हा व शहर कोरोना प्रतिबंधक लसीकरणात मागे आहे. मेच्या दुसऱया आठवडÎापासून शहरात अत्यल्प लस पुरवठा होत आहे. त्यामुळे लसीकरण रखडल्याने नागरिकांत नाराजी आहे. त्यातही 17 हजार जणांच्या दुसऱया डेसचा 84 दिवसांचा काळ निघून गेला आहे. त्यामुळे त्यांना दिलेला पहिला डोस वाया जाणार आहे. तरी लस पुरवठा वाढवून प्राधान्याने 84 दिवस पूर्ण झालेल्यांना लस द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, जिल्ह्यात एकूण 1 लाख 52 हजार 27 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. ही टक्केवारी 2.51 टक्के आहे. तसेच 4 हजार 611 जणांचा मृत्Îू झाला आहे. ते 3.80 टक्के आहे. शहरात आजपर्यत 39 हजार 248 रूग्ण असून ते प्रमाण जिल्ह्याच्या तुलनेत 25.82 टक्के आहे. 999 मृत्यू असून ती 21.63 इतकी टक्केवारी आहे. जिल्ह्यात 10 लाख 40 हजार 42 जणांना पहिला तर 2 लाख 76 हजार 153 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. शहरात 1 लाख 75 हजार 187 जणांनी लस घेतली आहे. यामध्ये 1 लाख 25 हजार 314 जणांनी पहिला तर 49 हजार 873 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यावरून शहरातील फक्त 7.95 अर्थात 8 टक्के इतके हे प्रमाण आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी 50 हजार लसीची मागणी केली, पण त्याचाही परिणाम नाही. 5 दिवसांत शहरात 9 हजार नवे रूग्ण दिसून आले. हे प्रमाण 6.91 टक्के आहे. तर लसीकरण अवघे 1.75 टक्के आहे. पाच दिवसांत 774 जणांनी पहिला तर 3330 जणांनी दुसरा डोस घेतला. शहरासाठी अद्यापी 9 लाख 80 हजार डोस आवश्यक आहेत. गेल्या 5 दिवसांत अन्य जिल्ह्यात रूग्णसंख्या घटली आहे पण तेथे लसीकरणात वाढ झाली आहे. कोल्हापुरात नेमकी उलट स्थिती आहे. याला मंत्र्यांसह जिल्हा प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केला. तसेच 8 दिवसांत लस पुरवठा न झाल्यास पालकमंत्री, कामगार मंत्री, आरोग्य राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला.