ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. आशिष गायकवाड, ऍड. श्रीराम पिंगळे, ऍड. राजेंद्र दाते-पाटील करणार मार्गदर्शन
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देवून खटला घटनापीठाकडे वर्ग केला. त्यामुळे आता मराठा आरक्षणाची लढाई न्यायालयामध्ये लढली जाणार आहे आरक्षणप्रश्नी कायदेविषयक चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे आज कोल्हापुरात न्यायिक परिषद आयोजित केली आहे. रविवार 4 रोजी सकाळी 10 वाजता लोणार वसाहत येथील महाराजा हॉल येथे परिषदेस प्रारंभ होईल. यामध्ये पुढील न्यायालयीन लढाईबाबत विचार विनिमय होणार आहे.
परिषदेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर येथील निमंत्रित विधी तज्ञ, सर्व बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, `नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण संदर्भातील खटला चालवलेले ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. आशिष गायकवाड, ऍड. श्रीराम पिंगळे, ऍड. राजेंद्र दाते-पाटील मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सहा जिह्यातील वकील व कोल्हापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. अजित मोहिते, ऍड. संपतराव पवार, ऍड. शिवाजीराव राणे, ऍड. विवेक घाडगे, ऍड. आर. एल. चव्हाण, ऍड. प्रकाश मोरे, ऍड. प्रशांत शिंदे, ऍड. प्रशांत चिटणीस, ऍड. रणजीत गावडे उपस्थित राहणार आहेत.









