- कोलकाता उच्च न्यायालयाचे आदेश
ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवातील दुर्गा पूजेच्या मंडपात प्रवेश करण्यास भक्तांवर बंदी घालण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने या संदर्भात आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार केवळ काही संयोजकांना प्रवेश देण्यात आला आहे. या संयोजकांची नावे त्यांच्या प्रवेश द्वारासमोर सूचना पत्रकामध्ये देण्यात आली आहेत आणि केवळ त्यांनाच मंडपात जाण्याची परवानगी असणार आहे. तसेच मंडपाबाहेर बॅरिकेट्स देखील लावण्यास सांगितले आहे. मोठया मंडळांसाठी हे अंतर 10 मीटर तर लहान मंडळांसाठी हे अंतर 5 मीटर इतके असणार आहे.
दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते की, देशातील काही राज्यांमध्ये म्हणजेच दिल्ली, उत्तर प्रदेशात कोरोनाचा संसर्ग वाढू नये या पार्श्वभूमीवर दुर्गा पूजेच्या आयोजनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन दुर्गा पूजेचे आयोजन करणार आहोत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. तसेच सार्वजनिक पूजेला परवानगी देण्यात आली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.









