ऑनलाईन टीम / बगदाद :
इराकमधील नसीरियाच्या अल-हुसैन रुग्णालयामध्ये कोविड वार्डाला भीषण आग लागली आहे. या आगीत 52 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. स्थानिक आरोग्य प्राधिकरणाचे प्रवक्ते हैदर अल-जामिली यांनी यांसदर्भात माहिती दिली.
हैदर अल-जामिली म्हणाले, अल-हुसैन रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेल्या
52 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, रुग्णालयातील इमारतीमध्ये आणखी काही मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोविड वॉर्डला ऑक्सिजन टँकचा स्फोट होऊन आग लागल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. अल हुसैन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे आणि त्यांना अटक करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच यासंदर्भात तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.









