चार कंपन्या आघाडीवर, भारताची उत्पादन क्षमता ठरणार महत्त्वाचा निकष, जागतिक रुग्णसंख्या 1 कोटी 73 लाखांवर
कोरोनावर लस शोधून काढण्याच्या जागतिक प्रयत्नांना चांगलाच वेग प्राप्त झाला असून सध्या चार कंपन्या यशाच्या नजीक पोहोचल्या असल्याचे वृत्त आहे. रशियाने केलेल्या दाव्यापाठोपाठ ऑक्सफर्ड, जॉन्सन अँड जॉन्सन व अन्य दोन कंपन्यांच्या लसीही उत्पादनाचे दरवाजे ठोठावत आहेत.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या अभ्यास अहवालानुसार ऑक्सफर्ड विद्यापीठाने ऍस्ट्राझेनेका या कंपनीसह निर्माण केलेल्या लसीही माकडांमधील कोरोना संसर्ग पूर्णत: थांबविला आहे. या लसीचे माणसांवरही प्रयोग सुरू असून वर्षअखेरीस ती बाजारात येऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे. या लसीचे सध्या तिसऱया टप्प्यातील परीक्षण सुरू असून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीने दुसऱया टप्प्यात प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या मॉडर्ना थेरप्युटिक्स या कंपनीच्या लसीचे माकडांवर आणि प्राण्यांवर प्रयोग सुरू असून या प्रयोगांना समाधानकारक यश मिळत असल्याचे न्यू इंग्लंड जर्नल या नियतकालिकाने म्हटले आहे.
दुसऱया टप्प्याचा अहवाल
ऑक्सफर्ड आणि मॉडर्ना यांच्या लसींसंबंधीची दुसऱया टप्प्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून तो समाधानकारक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या दोन्ही लसींच्या तिसऱया टप्प्यातील परीक्षणाला दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या टप्प्यात जगाच्या विविध भागांमध्ये हजारो लोकांवर प्रयोग केले जाणार आहेत. सुरक्षिततेचे महत्त्वाचे टप्पे त्यांनी पार केले आहेत.
रशियाची लस सप्टेंबरअखेर
मानवी परीक्षणांच्या सर्व पातळय़ा पूर्ण केल्याचा दावा रशियाने नुकताच केला होता. या लसीच्या मोठय़ा प्रमाणावरील उत्पादनासाठी अनुमती मागण्यात आली असून सप्टेंबरअखेरपर्यंत लस बाजारात थडकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. तसे झाल्यास ही कोरोनावरची बाजारात आलेली पहिलीच लस ठरेल.
मॉडर्नाला हवाय आर्थिक लाभ

चार अमेरिकन कंपन्यांच्या लसींसंबंधी नुकतीच अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींसमोर चर्चा झाली. ऍस्ट्राझेनेका, जॉन्सन अँड जॉन्सन आणि फित्झर या कंपन्यांनी ना नफा ना तोटा तत्वावर उत्पादन करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, मॉडर्ना कंपनीने आपला फायदा कमावण्याचा हेतू असल्याचे उघड केले. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी लवकरच लस येईल, असा आशावाद व्यक्त केला.
भारताचा निकष महत्त्वाचा

कोरोना लसीचे उत्पादन भारत किती मोठय़ा प्रमाणावर करू शकतो, यावर तिचे जागतिक यश अवलंबून असेल, असे विधान सांसर्गजन्य आजारांचे जागतिक तज्ञ डॉ. अँथोनी फुकी यांनी केले आहे. भारताची लोकसंख्या कोरोना प्रभावित देशांमध्ये चीनखालोखाल आहे. त्यामुळे भारताला प्रचंड प्रमाणात लसीचे उत्पादन करावे लागेल. सध्या भारतात सर्वाधिक वेगाने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भारतात कोटय़वधी लोकांना लस द्यावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातही काही कंपन्यांनी लसीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करण्यासाठी जोरदार तयारी चालविली आहे. दोन भारतीय कंपन्यांही लसनिर्मितीत जगाच्या बरोबरीने आहेत असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या प्रगतीचा अहवाल एक-दोन महिन्यांमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
‘प्रथम महिला’ बाधित

रिओ डि जानेरिओ : ब्राझिलच्या प्रथम महिला अर्थात अध्यक्ष बोल्सोनारो यांच्या पत्नी मिचेल यांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्राझिल सरकारने अधिकृत वक्तव्याद्वारे ही माहिती दिली. या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनाही ही बाधा झाली आहे. ब्राझिलच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्री सध्या उपचार घेत आहेत. मिचेल यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. बोल्सोनारो देखील दोन वेळा बाधित झाले होते. तथापि, सध्या ते ठणठणीत बरे आहेत.
चीनमध्ये पुन्हा उदेक

बीजिंग : चीनच्या झिनजियांग प्रांतात सलग तिसऱया दिवशी शंभरहून अधिक रुग्ण आढळले असून शुक्रवारी ही संख्या 127 होती. यापैकी 112 झिनजियांग प्रांतातील असून उर्वरित रुग्ण जवळच्याच लियोनिंग प्रांतातील आहेत. हा प्रांत झिनजियांग परिसरातलाच समजला जातो. या प्रांतात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनने 500 डॉक्टरांचे पथक पाठविले आहे, असे सांगण्यात आले.
सिंगापूर सुस्थितीत

सिंगापूर : सिंगापूर या छोटय़ा देशात कोरोना चांगलाच नियंत्रणात आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये नव्या रूग्णांची संख्या 50 टक्क्यांहून अधिक प्रमाणात घटली. आता केवळ चार प्रतिबंधित क्षेत्रांमध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असून लवकरच कोरोनामुक्तीच्या दिशेने हा देश वाटचाल करू लागेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
आयटोलिझुमॅब प्रभावी

हवाना : आयटोलिझुमॅब या विषाणूनाशक औषधाचा उपयोग कोरोनावर यशस्वी ठरल्याचा दावा क्मयुबा देशाने केला आहे. विशेषत: वयस्कर आणि वृद्ध रुग्णांसाठी हे औषध विशेषकरून प्रभावी आहे. याचे साईडइफेक्ट्स कमीत कमी असून इतर व्याधी असलेल्या लोकांनाही ते दिले जाऊ शकते, असे क्मयुबाच्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. इतर सामान्य उपचारांसोबत या औषधाचा उपयोग वेळेवर केल्यास मृत्यू टाळला जाऊ शकतो, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
एव्हरेस्ट खुले होणार

काठमांडू : कोरोनामुळे पर्वतारोहणावर बंदी घातलेल्या नेपाळने आता एव्हरेस्ट शिखर गिर्यारोहकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर हा एव्हरेस्ट गिर्यारोहण करण्याचा कालावधी मानला जातो. त्यामुळे यंदाच्या गिर्याराहण मोसमावरती कोरोनाचा परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा आहे.
निर्बंध कालावधीत वाढ

मनिला : फिलिपाईन्स देशाच्या सरकारने कोरोना निर्बंधावरील कालावधीत वाढ केली आहे. विशेषत: राजधानी मनिलामध्ये लॉकडाऊनसदृश परिस्थिती आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत निर्बंध सुरू राहणार आहेत. गुरुवारी फिलिपाईन्समध्ये एका दिवसातील सर्वाधिक नव्या रुग्णांचा उच्चांक गाठला गेला होता. त्यामुळे निर्बंध हटविण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. ग्रामीण भागातही आता मास्कचा उपयोग अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
रुग्णसंख्या फुगली

हनोई : व्हिएतनाम देशात डा नांग परिसरात गुरुवारी मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने निर्बंध लादण्यात आले आहेत. शुक्रवारी तेथे रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाला. शुक्रवारी या देशातील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.









