प्रतिनिधी/ पणजी
सप्टेंबर अखेरपर्यंत गोव्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 25 ते 30 हजारपर्यंत पोचण्याची शक्यता आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनाचा सामुदायिक फैलाव सुरू झाला असून एका दिवसात 1000 पर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडण्याची शक्यताही राणे यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना संदर्भातील कोणतीही माहिती आरोग्य खाते लोकांपासून लपवीत नाही, असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. प्लाझ्मा थेरपी सकारात्मक परिणाम दाखवित असल्याने सरकार कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरेपी देणे सुरूच ठेवणार आहे. प्लाझ्मा आणि रेमडेसीवीर मेडिसीन कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. प्लाझ्मा ट्रान्समीशनसाठी आणखी एक एफेरेसीस मशीन खरेदी केले जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
डॉ. जोझ डिसा यांना डिस्चार्ज
आरोग्य संचालनालयाचे संचालक जोझ डिसा यांना दोन वेळा प्लाझ्मा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती आता सुधारली आहे. आतापर्यंत 70 कोरोनामुक्त लोकांनी प्लाझ्मा दान केल्याचे त्यांनी सांगितले. मार्च 16 ते 2 सप्टेंबर या कालावधीत रुग्णांवर 1.7 लाख वेगवेळय़ा चाचण्या केल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. डॉ. जोझ डिसा यांना मणिपाल इस्पितळातून डिस्चार्ज दिल्याचे त्यांनी सांगितले.
गोमेकॉचा ऑप्थेल्मोलॉजी विभाग कोविडसाठी
गोमेकॉतील ऑप्थेल्मोलॉजी विभाग आता कोविड विभाग केला जाणार आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत हा विभाग कार्यान्वीत होणार आहे. कोविड इस्पितळातील खाटा भरल्या आहेत. तसेच खासगी इस्पितळातील खाटाही भरल्या आहेत. गोमेकॉत खाटांचा तुटवडा असल्याने रुग्णांना जमिनीवर झोपावे लागले, हेही त्यांनी यावेळी मान्य केले. एकाच वेळी अचानकपणे रुग्ण वाढल्यास अशी स्थिती निर्माण होते. अशावेळी आवश्यक ते निर्णय घेण्यास डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
आज डॉक्टरांची टीम पाहणी करणार
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे कोविड इस्पितळ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. आज शनिवारी डॉक्टरांची टीम पाहणी करणार व नंतर निर्णय घेतला जाणार आहे. 250 खाटा घालून इस्पितळ सुरू करणार आहे. मात्र 560 रुग्णांची सोय करण्याची इथे क्षमता आहे. आरोग्य सेवा संचालनालयाचे 10 आरोग्य अधिकारी व 70 कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे.
गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतलेल्या लोकांना कोविड व्यवस्थापन कीट दिले जाणार आहे. यामध्ये थर्मामीटर, ऑक्सीमीटर, औषधे व अन्य उपकरणे असतील, ती मोफत दिली जाणार आहेत. अशा प्रकारची सुविधा पुरविणारे गोवा हे पहिले राज्य ठरणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे. पुढील 7 ते 8 दिवसांत हे कीट वितरित करण्यात येणार आहे. गोवा सरकार प्रती रुग्णामागे मोठा खर्च करीत असल्याचेही राणे यांनी सांगितले.









