स्वातंत्र्यदिनाच्या पूवसंध्येला राष्ट्रपती कोविंद यांचा आत्मविश्वास संवर्धक संदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या अनिर्बंध संसर्गाने जग धास्तावले असतानाच भारताने हा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केलेले लोकोत्तर प्रयत्न आणि दाखविलेला निर्धार कौतुकास्पद आहे, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाची प्रशंसा केली आहे. 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात त्यांनी इतर महत्वाच्या बाबींनाही स्पर्श करत देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
स्वतःच्या जीवाची चिंता न करता असंख्य डॉक्टर्स, परिचारक व परिचारिका, आयोग्य कर्मचारी इत्यादींनी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. स्थिती आव्हानात्मक असूनही त्यांनी निर्धार आणि आत्मविश्वास ढळू दिला नाही. या सर्व कोरोना योद्धय़ांचा देश शतशः ऋणी आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि विविधतेने भरलेल्या देशात हे प्रयत्न विशेष महत्वाचे ठरतात. कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षकांनीही कुटुंब आणि स्वतःची सुरक्षा यांचा विचार न करता देशसेवा केली आहे. या काळात सर्व राज्यसरकारांनीही या काळात स्पृहणीय कामगिरी केली आहे, अशी भलावण राष्ट्रपतींनी केली.
अनेक धडे शिकलो
कोरोनाच्या या महासंकटाने आपल्याला अनेक धडे शिकविले आहेत. मानव हा निसर्गाचा स्वामी आहे हा माणसाचा भ्रम उध्वस्त झाला आहे. आत्मनिर्भरतेचा धडाही आपल्याला मिळाला आहे. आता या अनुभवावरून आपण अधिक उत्तरदायी आणि शहाणे होऊन पुढील वाटचाल स्वबळावर करण्याची सज्जता केली पाहिजे. त्याला आता पर्याय नाही, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
संशोधकांचे अथक प्रयत्न
कोरोनावर औषध आणि लस शोधण्याचे अथक प्रयत्न संशोधक करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल. भारताने इतर देशांनाही औषधांचा पुरवठा त्यांच्या मागणीनुसार करून आंतरराष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे. याची नोंद जगाने घेतली आहे, अशीही भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
कामगारांना सर्वाधिक त्रास
कामगार आणि रोजगारावर आयुष्य कंठणाऱयांना या संकटाचा त्रास सर्वाधिक झाला आहे. यात स्थलांतरीतांचाही समावेश आहे. सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचा त्रास काही प्रमाणात दूर झाला, याचाही उल्लेख राष्ट्रपतींनी केला. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन आपण अनेक बंधनांमध्ये साजरा करीत आहोत. पण त्याची कारणे आपल्याला माहित आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.









