राज्यात शुक्रवारी 8,249 नवे कोरोना रुग्ण
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून शुक्रवारी पॉझिटिव्हीटी दर 4.86 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. राज्यातील बेळगाव, मंगळूर, हासन, शिमोगा आणि म्हैसूर जिल्हय़ांमधील संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे तेथे ठोस उपाययोजना करण्याची सूचना दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी जिल्हा प्रशासनांना दिली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात शुक्रवारी 1,69,695 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर दिवसभरात केवळ 8,249 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मागील चोवीस तासांत 14,975 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात दिवसभरात 159 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मागील आठवडाभरापासून मृत्यूचा दर नियंत्रणात आला आहे.
बिदरमध्ये सर्वात कमी रुग्ण
राज्यात आतापर्यंत एकूण 3,13,63,615 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी एकूण 27,47,539 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 25,22,105 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर एकूण 32,644 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बिदर जिल्हय़ामध्ये दिवसभरात केवळ 9 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर गुलबर्गा जिल्हय़ात 29, यादगीरमध्ये 21, रामनगर 57, रायचूर 61, हावेरी 65, गदग जिल्हय़ात 66 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.









