हैदराबाद / वृत्तसंस्था
तेलगू देसम पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री अखिला प्रिया यांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन व्यापाऱयांच्या अपहरणप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी हैदराबादमधील 3 व्यापारी बंधूंचे अपहरण करण्यात आले होते. हे व्यापारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या स्वीय सहाय्यक वेणूगोपाळ राव यांचे नातेवाईक आहेत. जमिनीच्या वादातून अखिला प्रिया यांनी या व्यापाऱयांचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हैदराबादमधील हाफीजपेट भागात असलेल्या 25 एकर जमिनीच्या तुकडय़ावरून अखिला प्रिया आणि या व्यापारी बंधूंमध्ये वाद सुरू होता. या जागेतील हिस्सा अखिला प्रिया यांना हवा होता. त्यांची ही मागणी व्यापारी बंधूंनी धुडकावून लावली होती. मंगळवारी रात्री बोवनपल्ली भागात असलेल्या मनोविकासनगरातील व्यापारी बंधूंच्या राहत्या घरी 10-15 जण घुसले होते. या तिघांना चौकशीसाठी नेण्याच्या बहाण्याने या अपहरणकर्त्यांनी तिघांचे अपहरण केले होते. अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱयांमधील प्रवीण राव हे राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू आहेत. या तिघांना घरातून नेल्यानंतर व्यापाऱयांच्या कुटुंबीयांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला होता. त्यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तिघांची शोधमोहीम सुरू केली होती. पोलिसांना तपासादरम्यान अखिला प्रिया यांच्यावर संशय यायला लागला होता, त्यामुळे त्यांनी तिला ताब्यात घेतले होते.









