ओटवणे/ प्रतिनिधी-
कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा पहिली ते आठवी पर्यतच्या शाळा बंद करण्यात आल्याने सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शाळा बंद न करता त्यावर शासनाने ठोस उपाययोजना करून शाळा सुरू ठेवाव्यात अशी मागणी माजगाव शिक्षण सहाय्यक संस्था माजगाव संस्थेचे सचिव सीए लक्ष्मण नाईक यांनी सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सि ए यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात खालील मुद्दे उपस्थित केले आहेत. कोव्हिट १९ मुळे दोन वर्षे जनता होरपळली आहे, परंतु आता सामना करायला पण शिकली आहे. आत्ताची परिस्थिती सरकार दाखवते तेवढी गंभीर आहे असे जाणवत नाही. तसेच शाळा सुरु ठेवण्यासाठी शाळेच्या जवळपास किंवा ४ ते ५ शाळांच्या मध्यावर फक्त मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारुन आणि तात्काळ सेवा देवून हया प्रश्नावर तोडगा निघू शकतो. सरकार अथवा सरकारी यंत्रणा याबाबत गांभीर्याने विचार करत नाही. तसेच एकदा बंद केले की आमचे काम संपलं असे सरकारला वाटत असावे बाकी काय ते पालक व शिक्षक बघून घेतील. शिक्षण ऑनलाईन सुरु ठेवता येईल पण ऑनलाईन नंतर ऑफलाईन सुरु झाल्यावर विद्यार्थामध्ये झालेली तथाकथित प्रगती आम्ही चांगलीच अनुभवत आहोत. स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष अध्यापन करणान्या शिक्षकांना हा निर्णय घेताना विचारात घेतले असेल असे वाटत नाही.