स्मार्ट अंगणवाडया आणि बोलक्या भिंतीबद्दल महिला व बाल विकास मंत्र्यांकडून शाब्बासकीची थाप
प्रतिनीधी / सातारा
कोरोनाकाळात अंगणवाडी सेविका, मदतनीस व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘ आपली अंगणवाडी, आपली जबाबदारी’ ओखळून अतिशय कौतुकास्पद काम केले आहे असे सांगत स्मार्ट अंगणवाडया आणि बोलक्या भिंतीबद्दल राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सर्वांना शाब्बासकी दिली.
महाबळेश्वरमधील मेटगुताड येथील अंगणवाड्यांना भेटी दिल्या यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण) रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
राज्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर असताना, अंगणवाडी सेविका, मदतनीस व विभागाच्या अधिकारी आपली सेवा देत होत्या. अंगणवाडया प्रत्यक्ष सुरू नसल्या तरी मात्र प्रसंगी ऑनलाइन पद्धतीने शिकवून बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणात कोणताही खंड पडू दिला नाही. शिवाय विभागाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेत ते यशस्वीपणे पार पाडले, आज मेटगुताड येथील जीवन ज्योत अंगणवाडी ॲड. यशोमती ठाकूर यांनी भेट दिली.
यावेळी अंगणवाडी क्रमांक ३च्या स्थानिक भाज्या, फळे, धान्य आणि सकस आहाराचे महत्त्व उपक्रम, अंगणवाडी क्रमांक ६९ च्या आकार प्रशिक्षण उपक्रमांतर्गत साहित्य प्रदर्शन व बेबी केअर किट वितरण कार्यक्रम, तसेच अंगणवाडी क्रमांक ७०च्या पोषण अभियानांतर्गत समुदाय आधारित विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध फळ- भाज्यांचे प्रदर्शन, स्थानिक लाभार्थींना वितरण, अन्न प्राशसन, सुपोषण दिवस असे विविध उपक्रम राबविण्यात आले. या स्तुत्य उपक्रमासह स्मार्ट अंगणवाडया, बोलक्या भिंती, जागे अभावी घराघरात फुललेल्या परसबागा याबाबत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सर्वांचे कौतुक केले.