कलंबिस्त कदमवाडीत पाच महिने सुरू आहे उपक्रम
दीपक गावकर / ओटवणे:
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील शाळा बंद आहेत. मात्र, सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावातील कदमवाडीत एका घरात युवक व ग्रामस्थांच्या सहकार्याने तब्बल पाच महिन्यांपासून नियमित शाळा भरत आहे. कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करून वाडीतीलच उच्चशिक्षित युवक-युवतींकडून पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. कोरोना काळातही राबविण्यात येत असलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक होत आहे. प्रत्येक गावातील युवा पिढी व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन असा अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविल्यास कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून साडेपाच महिने शाळा बंद आहेत. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे शिक्षणाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन कलंबिस्त कदमवाडीत एका घरात शाळा सुरू करण्याचा निर्णय या वाडीतील युवक-युवती व ग्रामस्थांनी घेतला. त्यानुसार कोविड 19 च्या नियमावलीचे पालन करून एका घरात ही शाळा भरविण्याचे नियोजन करण्यात आले. याला कदमवाडीतील सर्वांनीच सहकार्य केले.
पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना मार्गदर्शन
कलंबिस्त गावात कोणत्याही मोबाईल कंपनीचा टॉवर नाही. ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी कोणत्याही कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या सोईसाठी घरातच शाळा सुरू करण्याचा निर्णय कदमवाडीवासीयांनी घेतला. विशेष म्हणजे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सेमी इंग्रजीत देण्यात येत आहे. ही शाळा सकाळी 10.30 वाजता भरते आणि सायंकाळी 4.30 वाजता सुटते. दुपारी 1 ते 2 या वेळेत विद्यार्थी जेवणासाठी आपल्या घरी जाऊन पुन्हा शाळेत येतात. या शाळेत कदमवाडीतील एकूण 14 विद्यार्थी शिक्षण घेतात.
कदमवाडीतील विनायक कलंबिस्तकर, प्राजक्ता कदम, दिव्या कलंबिस्तकर या युवतींसह योगेश कदम हा युवक मुलांना शिकवत आहे. या शैक्षणिक उपक्रमासाठी कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक सुर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कोरोनाकाळातील कदमावाडीतील हा उपक्रम सर्वांसाठी आदर्शवत आहे. असा शैक्षणिक उपक्रम गावागावातील प्रत्येक वाडीत युवक-युवतींनी व ग्रामस्थांनी राबविल्यास कोरोनाशी दोन हात करताना विद्यार्थ्यांचे शिक्षणही सुरुच राहणार आहे.









