केवळ आठवडय़ाभरासाठी नवी समिती स्थापन : जुनी समिती सापडली होती वादाच्या भोवऱयात
प्रतिनिधी /पणजी
कोरोना महामारीच्या अनुषंगाने आवश्यक असणारी उपकरणे, औषधे व इतर साहित्याच्या खरेदीसाठी सरकारने आधीची समिती बरखास्त करून तिची पुनर्रचना केली आहे. या समितीचा कालावधी फक्त एक आठवडा असून 30 जूनपर्यंतच ती कार्यरत रहाणार आहे. अर्थात तिची मुदत फक्त एक आठवडय़ापुरतीच मर्यादित आहे.
महामारीची परिस्थिती हाताळून औषधे व पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी सरकारने यापूर्वी संयुक्त समिती नेमली होती. तिला मंत्रिमंडळाने देखील मान्यता दिली.
औषधांच्या खरेदीमुळे समिती वादाच्या भोवऱयात
ही समिती काही औषधांच्या खरेदीमुळे वादाच्या भोवऱयात सापडली होती. त्या समितीवर टीका झाल्यानंतर ती समितीच रद्द करण्यात आली आहे. ती समिती रद्द केल्यानंतर आता गोमेकॉचे डीन व आरोग्य खाते संचालक यांनी आवश्यकतेनुसार उपलब्ध निधीचा विचार करून खरेदी करावी, असे निर्देश नवीन समितीला देण्यात आले आहेत.
जुन्या समितीत राणेंच्या मर्जीतील सदस्य
गोमेकॉचे डीन नवीन समितीचे अध्यक्ष असून त्यात अतिरिक्त वित्त सचिवांना स्थान देण्यात आले आहे. आरोग्य सेवा संचालक, सहसंचालक, लेखा सहसंचालक, गोमेकॉचे लेखा अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. वित्तीय नियमांचे पालन करून यापुढे खरेदी केली जाणार आहे. आधीच्या समितीत वित्त विभागातील कोणत्याही अधिकाऱयाचा समावेश नव्हता. तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या मर्जीतील काहीजणांचा त्यात समावेश होता. त्यांना नवीन समितीतून वगळण्यात आले आहे.
खरेदीसाठी कडक नियम लागू करण्यात आले असून आणिबाणी प्रसंगीच खरेदी करावी. महामारीने त्रस्त झालेल्यांना सेवा मिळावी म्हणूनच ती खरेदी व्हावी, खरेदीचे मुल्यांकन पारदर्शक पद्धतीने करावे, ती आवश्यकतेपेक्षा जास्त नाही याची काळजी घ्यावी, व इतर नियम लावण्यात आले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करावी, असे नवीन समितीच्या आदेशात म्हटले आहे.
कोरोना रुग्णांवर बांबोळी, मडगावातच होणार उपचार :राज्यातील अन्य हॉस्पिटलांमध्ये कोरोन उपचार बंद
बांबोळी येथील गोमेकॉचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटल मडगाव ही दोन हॉस्पिटले वगळून इतर सर्व सरकारी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांपासून मुक्त करण्यात आली आहेत. म्हणजेच यापुढे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वरील दोनच हॉस्पिटल्स खुली राहणार आहेत. इतर सर्व सरकारी हॉस्पिटलातून कोरोना रुग्णांचे उपचार बंद करण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता वरील दोनच हॉस्पिटल फक्त कोरोना हॉस्पिटल म्हणून यापुढे कार्यरत राहाणार आहेत. इतर सर्व सरकारी हॉस्पिटल्स कोरोनातून वगळण्यात आली आहेत.
रुग्ण कमी होत असल्याने सरकारचा निर्णय
कोरोनाचे वाढते रुग्ण – बळी याची दखल घेऊन राज्य सरकारने सर्व प्रकारच्या हॉस्पिटलांमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड राखीव ठेवले होते व तेथे त्यांच्यावर उपचारही करण्यात येत होते. परंतु आता रुग्ण कमी झाल्याने ते राखीव बेड तसेच रिकामी राहत असल्याचे दिसून आले. इतर रुग्णांना देखील ते देता येत नसल्याने त्यांची अडचण होत असल्याचे समोर आल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. खासगी इस्पितळेही कोरोना रुग्णांपासून वगळण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. तथापी त्यांना कोरोना रुग्णांसाठी सेवा – उपचार द्यायचे असतील तर ती इस्पितळे देऊ शकतात, असा खुलासा आदेशातून करण्यात आला आहे.









