प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनावरील लस घेतलेल्या गळतगा (ता. चिकोडी) येथील एका आशा कार्यकर्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र, लसीकरणामुळे या महिलेचा मृत्यू झाला नाही, असा निर्वाळा जिल्हा आरोग्य विभागाने दिला आहे.
गळतगा येथील 33 वषीय आशा कार्यकर्तीला 22 जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली होती. त्यानंतर 31 जानेवारी रोजी तिला डोकेदुखी व उलटीचा त्रास सुरू झाला. चिकोडी येथे उपचार करून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
तेथून केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता 4 फेब्रुवारी रोजी या महिलेचा मृत्यू झाला आहे. यासंबंधी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्याशी संपर्क साधला असता त्या महिलेचा मृत्यू कोरोनावरील लसीमुळे झाला नाही हे आजवरच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. रक्तवाहिन्यांतील बिघाडामुळे तिचा मृत्यू झाला आहे. यासंबंधीचे सर्व अहवाल पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.









