कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस परिस्थिती भयानक होत आहे अशा परिस्थितीत आपला बचाव करण्यासाठी तज्ञांनी विविध गोष्टींचा अवलंब करण्यास सांगितला आहे, त्याचे पालन आपण करत आहोतच. आजवरच्या नवीन संशोधनातून असे आढळून आले आहे की काही प्रमुख जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन) जसे व्हिटॅमिन-सी, झिंक, व्हिटॅमिन-डी, हळद यांच्या नियमित सेवनाने यांचे शरीरातील अनेक गोष्टीवर कार्य होत असल्याने कोरोनापासून काहीअंशी मुकाबला करण्यास मदत होते. पुढे संशोधनातून असेही समजले आहे की ज्यांच्या शरीरात वरील जीवनसत्त्वांचा अभाव आहे अशा व्यक्तीला जर कोरोनाची बाधा झाली तर कोरोना संक्रमण तीव्र होते व मृत्यूचाही धोका अधिक असतो. मागील वर्षाच्या साथीमध्ये मृत झालेल्या अनेक कोरोना रुग्णांमध्ये वरील जीवनसत्त्वांची कमतरता होती असे दिसून आले आहे.
व्हिटॅमिन-सी, झिंक व व्हिटॅमिन-डी ही जीवनसत्त्वे कोरोना व्याधीमध्ये कशी मदत करतात हे पाहू. या सर्व व्हिटॅमिन्सचे मुख्य कार्य म्हणजे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवणे व शरीराला घातक ठरणाऱया विषाणूंशी लढा देणे, विषाणूंचा प्रादुर्भाव, प्रसार थांबवण्यास मदत करणे. कोरोना संक्रमण झाले तर इम्युनसेलमधील पांढऱया पेशी (लिंफोसाईट), फॅगोसाटिक, टी-सेल, बी-सेल सायटोकाईन, इंटरल्युकिन यांना जागृत करून त्यांचे कार्य, आयुष्य, संख्या वाढवण्यास, त्यांचे पोषण करण्यास व त्या पेशीना इजा होऊ न देणे, या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची कार्ये यांच्याद्वारे होतात. ही जीवनसत्त्वे फुफ्फुसांना संरक्षण देण्यासाठी, फुफ्फुसातील हानी, सूज (इन्फ्लमेशन) कमी करण्यासाठी, श्वसन मार्गातील सूक्ष्म अंतत्वचा संरक्षित करून तिथे न्यूमोनिया वाढू न देणे या कार्यात वरील तिन्ही जीवनसत्त्वांचा मोठा वाटा आहे. शरीरात संसर्ग झालाच तर पेशींमध्ये कोरोनाची शिंगे घुसण्यापासून रोखणे, सायटोकाईन स्त्राsम नियंत्रित करणे, इन्फ्लमेशन (दाह) कमी करणे, परिणामी कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्याचे महत्त्वाचे कार्य ही तिन्ही जीवनसत्त्वे करतात. यांच्या वापराने कोरोना मृत्यूचे प्रमाण व आजार सिरीयस होण्याचे प्रमाण मात्र कमी करू शकतो.
व्हिटॅमिन सी-(Ascorbic acid)-व्हिटॅमिन सी हाडे, त्वचा आणि रक्तवाहिन्यांसाठी अत्यावश्यक आहे. आपले शरीर सी-जीवनसत्त्व तयार करू शकत नाही, आपल्या आहारातूनच हे शरीरास प्राप्त होते, हे पाण्यात विरघळणारे आहे. याचे मुख्य कार्य म्हणजे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवणे व शरीराला घातक ठरणाऱया विषाणूंशी लढा देणे. नियमित व्हिटॅमिन-सी सेवनाने शरीरात कोलोजन तयार होऊन रक्तवाहिन्या बळकट होतात. रक्तस्राव, रक्तवाहिनी फुटणे यापासून बचाव होतो. सर्दीची तीव्रता कमी होऊन त्याचा कालावधी कमी होतो. प्रभावशाली अँटिऑक्सिडंट म्हणूनही कार्य होते. चीनमध्ये झालेल्या नवीन संशोधनात सिरीयस कोव्हिड उपचारामध्ये ज्यादा डोस व्हिटॅमिन-सी 1 ते 10 ग्रॅमपर्यंत शिरेवाटे 3 ते 4 दिवस सिरीयस पेशंटना दिल्याने, मंदश्वसन क्रिया (ARDS), फुफ्फुसातील पाणी, आजाराचा विषारीपणा (Toxicity) सुधारून मृत्यूदर कमी करता येतो असे आढळून आले आहे. कोव्हिड आजारांमध्ये व्हिटॅमिन-सीची शरीरास जादा मागणी असते. आंबट फळे, भाज्या, टोमॅटो, आवळा इत्यादी घटकातून सी-जीवनसत्त्व मिळते. याची प्रौढांमध्ये 90 मिलिग्रॅम, स्त्रियांमध्ये 75 मिलीग्राम, बालकांना 35 मिलिग्रॅम इतकी रोज आवश्यकता असते. कोरोना काळात ट्रीटमेंट व काळजी म्हणून नियमित 500 मि.ग्रा. ची एक गोळी काही महिन्यांसाठी घेऊ शकता. जादा डोस झाल्यास संडास, उलटी, मळमळ होऊ शकते.
झिंक-कोरोनामध्ये उपयुक्त झिंक हे मिनरल शरीरातील सर्व पेशी व सर्व संस्थांवर रक्षणाचे व नियंत्रणाचे कार्य करते. इम्युनिटी बुस्टर म्हणूनही याची ओळख आहे. नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की ज्यांच्या शरीरात झिंकची कमतरता आहे असे कोरोना रुग्ण गंभीर होऊन मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून डॉक्टरांच्या सल्ला घेऊन 40 ते 50 मी. ग्रॅ. झिंक रोज काही महिन्यासाठी घेतले पाहिजे. दारू पिणाऱयांमध्ये झिंकची कमतरता खूप जास्त असते. रोजच्या आहारातून मोड आलेले अथवा भिजवलेले कडधान्य, काजू, दुधाचे पदार्थ, मासे, अंडी, मटण यातून झिंक मिळते.
व्हिटॅमिन डी-कोरोना काळातील सर्वात महत्त्वाचे व अत्यंत उपयोगी जीवनसत्त्व म्हणजे व्हिटॅमिन-डी आहे. नैसर्गिकरित्या त्वचेखाली सूर्यकिरणामार्फत तयार होणारे व्हिटॅमिन म्हणजे डी-3, याला कोलेकॅल्शिफेरॉल असेही म्हणतात. वनस्पतीजन्य व मासे, दूध, दही, संत्रे, डाळी, अंडी, मशरूम अशा अन्नपदार्थाद्वारे तयार होणारे जीवनसत्त्व डी म्हणजे अर्गोकॅल्शिफेरोल (Vit-D2). ही दोन्ही जीवनसत्त्वे प्रत्येक पेशींचा घटक आहेत. हाडे, मांस पेशी, फुफ्फुसे, हृदय, इम्युनसेल, मेंदू या सर्व पेशींच्या कार्यात हा घटक गरजेचा असतो व त्याचे नियंत्रण कार्यही करत असतो. कॅल्शियम समतोल राखण्याचे कार्य यामुळे होते. जीवनसत्त्व-डीच्या कमतरतेमुळे कॅल्शियम प्रमाण कमी होऊन, हाडांचे विकार, हृदय, फुप्फुसे, स्नायू पेशी कमकुवत होतात तसेच मेंदूचे कार्य विस्कळीत होते. रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचा धोका असतो, परिणामी कोरोना गंभीर होऊन संसर्गही जादा होऊ शकतो. भारतात 90 टक्के नागरिकांमध्ये व्हिटॅमिन-डीची कमतरता दिसून येते. या डी-जीवनसत्त्वाचा रोजचा प्रौढांना डोस 2000 iu, मुलांना 400 iu, इतका आहे. शरीरातील डी अति कमतरता असते वेळी 60 हजार इं. युनिट्स डोस आठवडय़ातून एकदा असे आठ आठवडे व नंतर दर महिन्याला एकदा असे सहा महिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. वरील जीवनसत्त्वाप्रमाणेच हळदीचा वापर आवर्जून सांगितला जातो. हळदीमध्ये कुरक्मयूमीन हा मुख्य घटक कोरोनात महत्त्वाचे कार्य करतो. शरीरातील दाह, प्रतिकार शक्ती वाढवण्यास गती देणे, जंतूनाशक व मुख्यतः कोव्हिड व्याधीमधील सायटोकायीन वादळामुळे (Cytokine storm) झालेले पेशी कुजण्याचे व पेशीमृत करण्याचे काम मुख्यतः टय़ूमर नेक्रोसिस फॅक्टर (TNF) व इंटरलूकिंस (IL6)यांच्यामुळे होत असते. त्यांना काही प्रमाणात प्रतिबंध करण्याचे महत्त्वाचे कार्य (हळद) कुरक्मयूमीन करते. तसेच मृत पेशींचा शरीरातील साठलेला कचरा साफ करण्याचे कामही करते. म्हणून दूध हळद कोरोना व्यक्तीस महिनाभर दिली जाते.
कोव्हिड आजारात मुख्यतः शरीरात दाह (इन्फ्लमेशन), रक्ताच्या गुठळय़ा होणे, फुफ्फुसात न्यूमोनिया होऊन ऑक्सिजन कमी होणे, पेशींचा नाश होणे व शरीरातील रोगप्रतिकारशक्ती अतिप्रमाणात उत्तेजित होणे (सायटोकायीन स्त्राsम) याचा परिणाम म्हणून सर्व संस्थांवर त्याचा वाईट परिणाम, अशा गोष्टी घडतात. या सर्व घडामोडींमध्ये वरील जीवनसत्त्वांमुळे शरीरात काही ना काही फायदा होत असल्याने तसेच आजार गंभीर होण्यापासून, जीव वाचवण्यापर्यंत याचा उपयोग होतो. म्हणून आजारापूर्वी व आजारात याचा वापर होणे अत्यावश्यक वाटते. बाजारात या सर्व इम्युनिटी बुस्टर जीवनसत्त्वांची एकत्रित अशी गोळी मिळते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचा वापर करून कोरोना काळात आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे.
डॉ.संजय पंतबाळेकुंद्री








