वृत्तसंस्था/ पॅरिस
कोरोना महामारी समस्येमुळे चीनमध्ये 2020 साली आयोजित केलेल्या एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील टेनिस स्पर्धांपैकी काही उर्वरित स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने घेतला आहे.
चीनमध्ये कोरोनाचा प्रसार अद्याप संपूर्णपणे थांबला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चीनच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा फेडरेशनने काही टेनिस स्पर्धा रद्द केल्याचे सांगितले. चीनमध्ये डब्ल्यूटीए टूरवरील महिलांची अंतिम स्पर्धा खेळविली जाणार होती. पण आता ती रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, 2022 च्या बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी केवळ एकमेव पात्र फेरीची स्पर्धा घेतली जाईल, असे चीनच्या क्रीडा फेडरेशनतर्फे दोन आठवडय़ांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. प्रत्येक वषी चीनमध्ये जागतिक दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धा घेतल्या जातात. पण कोरोना समस्येमुळे यावेळी या स्पर्धा रद्द करण्यात आल्याने शौकीनांना निराश व्हावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया डब्ल्यूटीए टूरचे प्रमुख कार्यकारी स्टीव्ह सिमॉन यांनी व्यक्त केली. एटीपी टूरने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धा रद्द केली आहे. त्याचप्रमाणे बीजिंगमधील चायना खुली एटीपी स्पर्धा तसेच एटीपी-500, चेंगडू खुली, झुहाई टेनिस स्पर्धा आणि एटीपी-250 स्पर्धा यावषी रद्द करण्यात आल्या आहेत.









