शाळा जूनपर्यंत राहणार बंद, मुलांचा आयपॅडवर अभ्यास
संग्राम कासले / मालवण:
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. जगातील बहुतांश देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनचा पयार्य निवडला आहे. कॅनडामध्ये 31 मेपर्यंत लॉकडाऊन असून यात बदल होण्याची शक्यता आहे. परंतु, कोरोनाचा वाढत्या प्रसार व लॉकडाऊनमुळे कॅनडामध्ये बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. कॅनडातील ज्या लोकांच्या नोकऱया कॉम्प्युटरशी संबंधीत आहेत, त्यांनाच ‘वर्क फ्रॉम होम’अंतर्गत काम करता येत आहे. अन्यथा बाकी सर्व लोक आर्थिक अडचणीत असल्याची माहिती कॅनडा देशातील ऑन्टारिओ राज्यात डाटा आर्किटेक्ट म्हणून नोकरीस असलेले मूळ मालवण गवंडीवाडा येथील मॉन्टी मॅक्सी फर्नांडिस यांनी ‘तरुण भारत’शी व्हॉट्सऍप कॉलद्वारे संवाद साधताना दिली.
मॉन्टी फर्नांडिस म्हणाले, 15 जानेवारीला कॅनडामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तो चीन येथून माघारी आला होता. मार्चमध्ये कोरोनाच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात झाली. सध्या कॅनडामध्ये 48,500 ऍक्टिव्ह केस आहेत. त्यापैकी 18,000 पेक्षा जास्त लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 2707 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. कॅनडातील प्रत्येक राज्यात लॉकडाऊनची हाताळणी वेगळय़ाप्रकारे करण्यात आली आहे. मी राहत असलेल्या ऑन्टारिओ राज्यात कोरोनाचे 15 हजार रुग्ण आहेत. त्यापैकी 8000 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
काम बंद असणाऱयांना शासनाकडून 75 टक्के पगार
ऑन्टारिओ राज्यात 16 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आहे. आम्ही सात आठवडे घरूनच काम (वर्क फ्रॉर्म होम) करत आहोत. ज्यांची नोकरी कॉम्प्युटरशी संबंधीत आहे, त्यांना वर्क फ्रॉर्म होम करणे सोपे जात आहे. अन्य लोकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. कॅनडातील सर्व खानावळी बंद झाल्या आहेत. पण ऑनलाईन ऑर्डर करून जेवण मागवता येते. बहुतांश उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. परंतु शासन लोकांना मदत करत आहे. ज्या लोकांचे काम बंद झाले आहे. त्यांना शासनाकडून 75 टक्के पगार देण्यात येत आहे. देशातील लोकांची तपासणी आणि उपचार पूर्णपणे मोफत होत आहेत. लहान उद्योगांना शासन सबसिडी देत आहे, असे माँटी यांनी सांगितले.
शाळा जूनपर्यंत बंद
ते म्हणतात, कॅनडामधील शाळा जूनपर्यंत बंद असणार आहेत. सर्व उद्याने, वाचनालये, सरकारी ऑफिसेस बंद करण्यात आली आहेत. शाळा जूनपर्यंत बंद राहणार आहेत. पण शाळा ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुले आयपॅडद्वारे अभ्यास करत आहेत. कॅनडामध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जाण्यास बंदी आहे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र दिसले, तर पोलीस 880 डॉलरचा म्हणजे जवळपास 45 हजाराचा दंड वसूल करतात व त्याची रितसर पावती दिली जाते. ब्राम्पटॉन शहरात 18 भारतीय नागरिक खेळताना सापडले. त्यांनाही अशाप्रकारे दंड ठोठावण्यात आला. लोकांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहवे, यासाठी लोकांना काही वेळ फिरण्याची मुभा देण्यात आलेली आहे. परंतु फिरताना सोशल डिस्टन्सिंगचे भान लोकांनी ठेवणे आवश्यक आहे.
लोकांकडून ऑनलाईन सामान खरेदी
कॅनडामध्ये किराणा दुकानात थोडय़ा-थोडय़ा लोकांना आत सोडले जाते आणि बाकीचे लोक बाहेर रांगेत उभे राहतात. दोन व्यक्तींमध्ये दोन मीटरचे अंतर असते. दुकान उघडल्यानंतर पहिला एक तास ज्येष्ठ नागरिकांना खरेदीसाठी आत सोडले जाते. त्यानंतर इतर नागरिकांना आत सोडतात. त्यामुळे बहुतांश लोक ऑनलाईन पद्धतीने सामानाची खरेदी करतात.









