प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर परिसरात स्थानिक कोणाही कोरोना बाधित नाही. मात्र, बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे कोरोना साताऱयात घुसला होता. त्यानंतर त्यावर मात करत शहर कोरोनामुक्तीचा निश्वास टाकत असताना रविवारी शहरातील समर्थ मंदिर परिसरातील बालाजी अपार्टमेंटमध्ये रहात असलेला मात्र सध्या रायगाव येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये असलेल्या एकजणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अपार्टमेंट कंटेन्मेंट झोन करण्यात आला.
सातारा शहरात प्रतापगंज पेठ, गेंडामाळ, सदरबझार, गार्डन सिटीमधील बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. तर शहरातील जिल्हा कारागृहात आढळून आलेले कैदीही कोरोनामुक्त होवून घरी गेले असल्याने शहर कोरोनामुक्त झाले होते. मात्र आता समर्थ मंदिर सारख्या गजबजलेल्या परिसरात असलेल्या बालाजी अपार्टमेंटमधील एकजणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली.
साताऱयातील ही व्यक्ती त्याच्या नात्यातील बेलावडे, ता. जावली येथील कोरोना बाधिताच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आला होता. बेलावडे येथील एक गृहस्थ दि. 25 मे रोजी नवी मुंबईहून आले. त्यांना पॅरॉलिसिसचा त्रास होता. त्यामुळे उपचारासाठी साताऱयातील साईअमृत हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ते नात्याने सासरे असल्याने बालाजी अपार्टमेंटमधील व्यक्ती त्यांच्यासाठी धावपळ करत होती. सासऱयांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारास साताऱयातील पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती उपस्थित होती.
दरम्यान, बेलावडेच्या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांचा स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्यात ते सासरे कोरोना बाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे साताऱयातील जावयासह त्याचे मेव्हणे व इतर अशा 17 जणांना दि. 26 रोजी पासून हाय रिस्क कॉन्टॅक्टमुळे रायगाव, ता. जावली येथील क्वॉरंटाईंन सेंटरमध्ये ठेवलेले होते. यामध्ये साताऱयातील जावई असलेल्या व्यक्तीच्या घशातील स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला असून त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
ही बाब कळताच पालिका प्रशासनाने तातडीने उपाय योजना सुरु करत बालाजी अपार्टमेंट परिसर सील केला आहे. सासऱयाच्या संपर्कात आल्याने जावई कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने सर्व्हे सुरु केला आहे. अपार्टमेंट व परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली असून संबंधित व्यक्तीच्या हायरिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्टची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.








