प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण नाही यामुळे नागरिकांनी भिती बाळगू नये. अफवा आणि खोटय़ा माहितींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा समिक्षा अधिकारी डॉ. बी. एन. तुक्कार यांनी केले आहे. जिल्हा पंचायत शिक्षण व आरोग्य स्थायी समितीची बैठक शनिवारी जि. पं. सभागृहात पार पडली. यावेळी डॉ. तुक्कार यांनी कोरोनाबाबत आरोग्य खात्याच्यावतीने आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच सर्वसामान्यात जागृतीचे काम सुरू असून नागरिकांनी स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हय़ात चायना मेड पदार्थांच्या विक्रीवर दीड महिन्यापासून निर्बंध घालण्यात आले आहेत. होळी-रंगपंचमीनिमित्त रासायनिक रंगाचा वापर न करता केवळ नैसर्गिक रंग वापरावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले. सध्या अफवा आणि चुकीच्या माहितीमुळे मास्कचा वापर करण्याकडे ओढा वाढला आहे. मात्र केवळ रुग्ण व कुटुंबीयांनीच मास्कचा वापर करावा. बेळगावच्या सिव्हिल इस्पितळात पूर्व खबरदारी म्हणून दहा खाटांचा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला असून या ठिकाणी व्हेंटिलेटर, तज्ञ वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहेत. 24 तास या ठिकाणी वैद्यकीय सेवा राहणार असल्याची माहिती डॉ. बी. एन. तुक्कार यांनी दिली.
विद्यार्थ्यांना सर्दी, ताप आणि खोकला असल्यास अशा विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. असे जिल्हा शिक्षणाधिकाऱयांनी सांगितले. अन्य विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग फैलावू नये या दृष्टीने खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
डेंग्यू-चिकुनगुनियाचे रुग्ण
एकीकडे कोरोनाची सर्वसामान्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असताना बेळगाव जिल्हय़ात डेंग्यूचे रुग्णही आढळले आहेत. एकूण 87 रुग्णांच्या नमुन्यांपैकी 37 जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. अशी माहिती डॉ. पल्लेद यांनी बैठकीत दिले. तर चिकुनगुनियाचे 8 रुग्णही असल्याचे त्यांनी सांगितले.