बाहेरुन येणाऱयांचा भरणा अधिक : गोव्यासाठी भीतीदायक परिस्थिती : आणखी एक कोविड हॉस्पिटल स्थापणार
प्रतिनिधी / पणजी, मडगाव
गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चाचली आहे. काल रविवारी एकाच दिवशी 6 रुग्ण सापडले. यामध्ये कारवार येथून आलेल्या दोघांचा समावेश आहे. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या 19 एवढी आहे. त्याचबरोबर आणखी 11 रुग्ण ट्रुनेट चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यांची पुन्हा व्हायरोलॉजी लॅबमध्ये चाचणी घेण्यात आली आहे. त्यांचा अहवाल सकारात्मक आल्यास रुग्णांची संख्या 30 पर्यंत पोहोचणार आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आणखी एक कोविड हॉस्पिटल उभारण्याची तयारी सरकारने चालविली आहे.
दिल्ली-गोवा रेल्वेतून येणारे प्रवासी जास्त प्रमाणात कोरोनाचे वाहक असल्याचे चाचणीतून आढळून येत आहे. मागील चार दिवसात एकूण रुग्णांची संख्या 19 झाली आहे. गुरुवारी एकूण 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. शुक्रवारी रुग्ण सापडले नाहीत, मात्र शनिवारी तब्बल 5 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्यामुळे आकडा 13 वर पोहोचला. त्यानंतर रविवारी अचानकपणे 6 नवे रुग्ण सापडले. हे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 झाली आहे.
आणखी 11 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्यास आकडा 30 वर
आणखी 11 रुग्ण ट्रूनेट चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यांची आता पुन्हा गोमेकॉतील व्हायरोलॉजी लॅबमध्ये चाचणी होणार आहे. या चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांची संख्या 30 वर पोहोचणार आहे. तसे झाले तर गोव्याचे चित्र धोकादायक बनणार आहे.
रेल्वेतून येणाऱया प्रवाशांमुळे आकडा वाढला
दिल्ली-गोवा रेल्वेतून येणाऱया प्रवाशांमध्ये जास्त प्रवासी कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी 368 प्रवाशांना घेऊन रेल्वे आली आहे. त्यामुळे या प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे. त्यातूनही नवे रुग्ण सापडण्याची भीती आहे. राजधनी एक्सप्रेस ही रेल्वे पुढील आठवडय़ापासून गोव्यात येणार नाही, मात्र निजामुद्दीन एक्सप्रेस ही रेल्वे येणार नाहे. त्यामुळे गोव्याला धोका कायम आहे.
आणखी एक कोविड इस्पितळ
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आता आणखी एक कोविड इस्पितळ स्थापन करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. पहिले कोविड 19 इस्पितळ मडगाव येथे स्थापन केले आहे.
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात 19 रुग्ण
मडगावच्या कोविड-19 हॉस्पिटलात दाखल करण्यात आलेल्या रूग्णांची संख्या काल रविवारी सायंकाळपर्यंत 19 वर पोचली होती. रात्री उशिरापर्यंत या संख्येत आणखी वाढ होणार असल्याची माहिती कोविड हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिली. शनिवारी दिल्लीहून राजधानी एक्सप्रेसमधून आलेल्या प्रवाशांमुळे ही संख्या झपाटय़ाने वाढत गेली आहे. रविवारी कोविड-19 हॉस्पिटलमध्ये एकूण 17 जणांवर उपचार सुरू होते. त्यात नंतर आणखी दोघांची भर पडल्याने ही संख्या 19 वर पोचली. त्याशिवाय रात्री आणखी किमान दहाजण येणार असल्याची कल्पना गोमेकॉतून देण्यात आली आहे. त्यामुळे आज सोमवारपर्यंत ही संख्या आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्या उपचार घेत असलेल्यांमध्ये 18 प्रौढ व एका बालकाचा समावेश आहे.
मडगावच्या या हॉस्पिटलमध्ये 100 खाटांची सोय उपलब्ध असून त्यात आणखीन 60 खाटा वाढविणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जर रूग्णांची संख्या वाढलीच तर इतर पर्याय निवडले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोविड-19 हॉस्पिटलमध्ये 25 व्हँटीलेटरची सोय उपलब्ध आहे.
आकडा 60 वर पोहोचण्याची भीती : आरोग्यमंत्री राणे
कोरोनाबाधितांचा आकडा सोमवारपर्यंत 30 ते 35 वर पोहोचण्याची भीती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने अहवाल येत आहेत ते पाहता गोव्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 50 ते 50 वर पोहोचण्याची शक्यता राणे यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री घाबरण्यासारखी स्थिती नसल्याचे सांगतात तर आरोग्यमंत्री चिंता व्यक्त करीत आहेत. त्यामुळे ही परस्परविरोधी विधाने वेगळेच संकेत देत आहेत. विमाने, रेल्वे बंद व्हायला हव्यात तसेच राज्यात उगाचच लोकांना प्रवेश दिला जाऊ नये. राज्यातील लोकांचा वावरही मर्यादीत असावा, असेही विश्वजित राणे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे
कोरोनाबाधित वाढले तरी : गोमंतकीयांनी घाबरू नये
दहावीची परीक्षा ठरल्यानुसारच होणार
लॉकडाऊनमध्ये 31 मे पर्यंत वाढ : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
केंद सरकारने दिलेल्या निर्देशानुसार गोव्यातही लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. केंद्र सरकारने याबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. गोव्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात येईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. जास्तीतजास्त लोकांना दहावीची परीक्षा घेतलेली हवी आहे. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. जे लोक कोरोना पॉझिटिव्ह ठरले ते सर्व बाहेरून आलेले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
लॉकडाऊन 4 चा कालावधी 18 मे पासून सुरू होत असून 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. गोव्यासाठी जी मार्गदर्शक तत्वे लागू होतील ती सोमवार 18 रोजी सायंकाळपर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहव्यवहार मंत्रालयाशी रविवारी रात्री 9 वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा होणार आहे. त्यानंतर सोमवारी मार्गदर्शक तत्वे जाहीर होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात याव्यात असे जास्तीतजास्त लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना घाबरविण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, मात्र ते गोव्याबाहेरून आले आहेत. त्यांना लोकांमध्ये सहभागी व्हायला दिलेले नाही. त्यांना अगोदरच रेल्वे स्थानकावर अडवून ठेवले. त्यांची कोरोना चाचणी केली आणि जे पॉझिटिव्ह ठरले त्यांना इस्पितळात दाखल केले आहे. वस्तू घेऊन येणारी वाहने सरकार अडवू शकत नाही. कारण या वस्तू गरजेच्या आहेत म्हणून आणल्या जातात. आता सरकारने जास्त प्रमाणात थर्मल स्कॅनिंग सुरू केले आहे. चेक नाक्यावर त्यांची तपासणी होईल व संशयित आढळल्यास त्यांना तिथेच वेगळे केले जाईल. तशा सूचनाही दिलेल्या आहेत. बाहेरून गोव्यात येणाऱयांवर नियंत्रण ठेवले तर गोव्यात संख्या वाढणार नाही, अशी खात्री आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जे दोन रुग्ण रविवारी सापडले ते सोडले तर 16 प्रकरणे लक्षणे नसलेली आहेत. त्याचबरोबर त्याची प्रकृती सुधारणार याची खात्री असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आकडा वाढला तरी गोमंतकीयांनी घाबरण्याचे कारण नाही. अन्य राज्यांच्या मनाने गोव्याची स्ट्रेटजी वेगळी आहे. रेल्वे वाहने यातून येणाऱया सर्व प्रवाशांना चाचणी करूनच प्रवेश दिला जात आहे. गृहमंत्री अमित शहा व रेल्वे मंत्र्यांशीही आपण चर्चा केली आहे. येणाऱया प्रवाशांवर विचार करावा लागणार आहे. कारण गोव्यात जे रुग्ण सापडले ही सर्व प्रकरणे आयात प्रकरणे आहेत, मात्र गोव्यातील लोकांना आताच घाबरून जाण्याचे कारण नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.









