तीन-चार दिवसांत निर्णय : सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
अपेक्स बँक, डीसीसी बँक आणि प्राथमिक कृषी पतसंस्थेतून कर्जे घेतलेल्या आणि त्यापैकी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 10,187 शेतकऱयांची 79.47 कोटी रुपयांची कर्जे माफ करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी चालविला आहे. येत्या तीन-चार दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी दिली.
लवकरच अपेक्स बँक व्यवस्थापन मंडळाशी चर्चा करून कर्जमाफीविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाकाळात शेतकऱयांच्या पाठीशी राहण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱयांना आणखी अनुकूल व्हावे, यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात येतील, असे ते म्हणाले.
मागीलवर्षी 2020-21 या आर्थिक वर्षात 24 लाख 50 हजार शेतकऱयांना 15,300 कोटीची कृषीकर्जे देण्याचे उद्दिष्ट बाळगले होते. पण, प्रत्यक्षात 25 लाख 67 हजार शेतकऱयांना 17,108 कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. या 25.67 लाख शेतकऱयांपैकी 10,187 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांची 79.47 कोटीची कर्जे माफीविषयी येडियुराप्पा यांनी विचार चालविला आहे.
मागीलवर्षी शेतकऱयांना दिलेली कर्जे…
बेळगाव जिल्हय़ात मागीलवर्षी 3,334 शेतकऱयांनी 23 कोटी रुपयांची कृषी कर्जे घेतली आहेत. तर बागलकोट जिल्हय़ातील 672 शेतकऱयांनी 5.42 कोटी रु. कर्जे घेतली आहेत. कारवार जिल्हय़ातील 186 शेतकऱयांनी 1.70 कोटी रु., धारवाड जिल्हय़ातील 376 शेतकऱयांनी 2.07 कोटी रु. तर विजापूर जिल्हय़ातील 754 शेतकऱयांनी 5.13 कोटी रुपयांची कृषी कर्जे घेतली आहेत. यापैकी कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकऱयांची कर्जे माफ करण्याचा विचार सरकारने चालविला आहे.









