मृतांचा आकडा 13 वर, विजयनगर-हिंडलगा, शिवबसवनगर, अथणी येथील बाधितांचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीमुळे मृतांचा आकडा वाढताच आहे. दोन दिवसांत बेळगाव शहरातील दोघा जणांसह एकूण तिघे जण दगावले आहेत. शिवबसवनगर येथील वृद्धा, हिंडलगा येथील वृद्ध व अथणी येथील वृद्धाचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्हय़ातील एकूण मृतांचा आकडा 13 वर पोहोचला असून हा आकडा वाढण्याचा धोका आहे.
बिम्स प्रशासनाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांत कोरोनामुळे तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांचा आकडाही वाढत चालला असून त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील व्यवस्था अपुरी पडत आहे. खासगी इस्पितळातही उपचार सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शनिवारी सिव्हिलला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहाणी केली होती.
उपलब्ध माहितीनुसार अथणी येथील 62 वषीय कोरोनाबाधिताचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. तर शिवबसवनगर येथील एका 80 वषीय वृद्धेला सिव्हिल हॉस्पिटलला आणताना शुक्रवारी 10 जुलै रोजी वाटेतच तिचा मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री तिचा स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तर विजयनगर हिंडलगा येथील एका 57 वषीय रहिवाशाला 10 जुलै रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा स्वॅब तपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे विजयनगर-हिंडलगा परिसरात खबरदारी घेण्यात येत आहे. बेळगाव शहर व अथणी या दोन तालुक्मयात मृतांची संख्या वाढती आहे.
राज्य आरोग्य विभागाने रविवारी रात्री जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार संपूर्ण राज्यात 532 हून अधिक कोरोनाबाधितांची स्थिती नाजूक आहे. बेंगळूर शहरात 314 जणांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले आहे. तर बेळगाव जिल्हय़ातील 9 बाधितांवर आयसीयुमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी डॉक्टरांची चिंता वाढली आहे.
आणखी दोन अहवाल प्रलंबित
गेल्या 24 तासांत अनगोळ येथील एका 77 वषीय वृद्धासह आणखी दोघा जणांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. त्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून अद्याप अहवाल आलेला नाही. अहवाल आल्यानंतरच या दोघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. बिम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी यांच्याशी संपर्क साधला असता अथणी, विजयनगर-हिंडलगा व शिवबसवनगर येथील रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. आणखी दोन मृतांचे स्वॅब तपासणी अहवाल अद्याप आलेले नाहीत.
व्हिडिओ चित्रीकरणामुळे गोंधळ
अनगोळ येथील 77 वषीय वृद्धाचा सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्जिकल ब्लॉकमध्ये रविवारी दुपारी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी स्वॅब तपासणी न करताच मृतदेह सोपविण्याची मागणी केली. मात्र, बिम्स कर्मचाऱयांनी तपासणी अहवाल आल्यानंतरच मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर एका तरुणाने कोविड-19 वॉर्डमधील दृश्ये चित्रीकरण करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱयांनी त्याला आक्षेप घेतला. एपीएमसी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस येताच चित्रीकरण करणारा तरुण व त्याच्या दोन साथीदारांनी तेथून पळ काढला. त्या वृद्धाचा मृतदेह सध्या शवागारात ठेवण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री किंवा सोमवारी सकाळपर्यंत त्याचा अहवाल येणार आहे, असे बिम्स प्रशासनाने सांगितले.









