मनोदर्पण कार्यक्रमासह हेल्थ क्लब स्थापण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनानंतरच्या शाळांचा प्रारंभोत्सव शाळांबरोबरच शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी देखील आव्हानात्मक ठरणार आहे. आठ ते दहा महिन्यांच्या सुटीनंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा मानसिक व भावनिकदृष्टय़ा आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षकांना करावे लागेल. त्याचवेळी नियोजनाप्रमाणे वर्ग सुरू राहणार आहेत. यासाठी प्रशासनाने शाळा स्तरावर मनोदर्पण कार्यक्रम व हेल्थ क्लब स्थापन करण्याचे आवाहन केले असून यामुळे शाळांना एसओपीच्या अंमलबजावणीबरोबरच विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य देखील जपावे लागणार आहे.
2020-2021 या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्यापूर्वीच लॉकडाऊन झाले. परिणामी ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. मात्र सध्या परिस्थिती निवळत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्यादृष्टीने दहावी व बारावीचे वर्ग 1 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे प्रदीर्घ सुटीनंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील त्यावेळी विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्याबरोबरच शाळेतील उत्साह वाढविण्यासाठी मानसिक व भावनिक आपुलकी देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी मनोदर्पण कार्यक्रमाची अंमलबजावणी व हेल्थ क्लबची स्थापना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
विविध उपक्रम राबविणे गरजेचे
मनोदर्पण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, प्रेरणा मिळेल, असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केल्यापासून संपूर्ण वर्ग संपेपर्यंत निराशा अथवा मरगळ येईल, असे अध्यापन न करता त्यांच्या मानसिकतेचा विचार त्याठिकाणी होणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थी मानसिकदृष्टय़ा अभ्यासात रुळल्यास पुढील अध्यापन प्रक्रिया सोयिस्कर होईल.
शिवाय मानसिक आरोग्य जपण्याबरोबरच शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी हेल्थ क्लबची स्थापना करून शारीरिक आरोग्य कसे राखावे. यासाठी कशाप्रकारे काळजी घ्यावी, व्यायाम, ध्यान, चिंतामुक्त राहण्यासाठीचे उपाय याविषयी मार्गदर्शन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे कोरोनानंतरची शैक्षणिक वाटचाल आव्हानात्मक ठरणार आहे.









