वर्षात अडीच लाख प्रवाशांचा विमानप्रवास : डिसेंबरमध्ये 9.41 मेट्रिक टन कार्गो वाहतूकही

प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे देशातील रस्ते-रेल्वे वाहतुकीसह विमान वाहतूकही मंदावली होती. परंतु यामध्येही बेळगावच्या सांबरा विमानतळाने दमदार कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. 2020 या वर्षभरात तब्बल 2 लाख 51 हजार 294 प्रवाशांनी विमानप्रवास केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 2019 च्या तुलनेत ही प्रवासी संख्या वाढली आहे. यामुळे बेंगळूर व मंगळूरनंतर सर्वाधिक प्रवासी संख्येचे विमानतळ म्हणून बेळगावला ओळख मिळाली आहे.
बेळगावमधून बेंगळूर, हैद्राबाद, मुंबई, पुणे, नाशिक, कडप्पा, तिरुपती, म्हैसूर, इंदूर, अहमदाबाद, सुरत, चेन्नई या शहरांना थेट विमानसेवा तर अजमेर, विजयवाडा या शहरांना कनेक्टिंग विमानसेवा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत प्रत्येक महिन्याला वाढ होताना दिसत आहे. 2020 मध्ये एकूण 5 हजार 780 विमानांची बेळगाव विमानतळावरून ये-जा झाली आहे. दररोज 12 ते 15 विमाने बेळगावमध्ये दाखल होत आहेत. यातून 1200 ते 1500 प्रवासी विमान प्रवास करीत आहेत.
कार्गो वाहतुकीमध्येही वाढ
बेळगावमधून थोडय़ा प्रमाणात कार्गो वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. स्पाईस जेटने कार्गो वाहतूक सुरू केल्यामुळे नागरिकांना त्वरित मालाची वाहतूक करणे सोयीचे ठरत आहे. डिसेंबर 2020 मध्ये 9.41 मेट्रिक टन कार्गो वाहतूक झाल्याचे डीजीसीएच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात कार्गो वाहतूक वाढण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.









