ठाण्यात हायरिस्क भागात डय़ुटी : मुलीलाही ठेवावे लागतेय दूर
मयुर चराटकर / बांदा:
कोरोनाच्या संकटकाळात सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस येथील कन्या व माडखोल-फुगीवाडी येथील श्रद्धा सागर बेटकर (गावडे) ही सिंधुदुर्गची कन्या ठाणे (शिवाजीनगर) येथील हेल्थ सेंटरमध्ये परिचारिका म्हणून सेवा बजावत आहे. ती काम करत असलेल्या भागात आतापर्यंत 20 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. घरात तीन वर्षाची मुलगी असतानाही केवळ घरच्यांच्या सहकार्यामुळेच ते रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला विलगीकरण कक्षात दाखल करण्याचे जोखमीचे काम करत आहे.
देशसेवा, नैतिकता, समर्पण हे शब्द बोलायला सोपे वाटतात. मात्र, प्रत्यक्षात लढाईची वेळ आली की अनेकजण दूर पळतात. मात्र, श्रद्धा बेटकर संकटकाळात कोरोनाबाधित क्षेत्रात डय़ुटी बजावत आहेत. सकाळी घरातून बाहेर पडण्याची वेळ ठरलेली आहे. मात्र, घरी परतण्याची वेळ रुग्णावरच अवलंबून असते. गेल्या दोन महिन्यात त्या कधीच घरी रात्री दहाच्या आत पोहोचलेल्या नाहीत. घरी मुलीला आईची प्रतीक्षा असते. मात्र, तिला जवळही घेता येत नाही. यामुळे कधी-कधी रडायलाही येते. पण आपण ज्या क्षेत्रात काम करतो, तेथे प्रामाणिकपणे काम करावे, यासाठी मी कुटुंबियांच्या सहकार्याने कर्तव्य बजावत असल्याचे श्रद्धा यांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना सांगितले.
मूळ पाडलोस येथील
श्रध्दा बेटकर-गावडे या मूळ पाडलोस येथील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण पाडलोस, माध्यमिक शिक्षण मडुरा हायस्कूलमध्ये तर बारावीचे शिक्षण खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांनी नर्सिंगचे शिक्षण अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे घेतले. ते पूर्ण झाल्यावर पेण येथे काही दिवस परिचारिका म्हणून काम केले. त्यानंतर ठाणे महानगरपालिका येथे नोकरी मिळाली. गेली सात वर्षे त्या सेवा बजावत आहेत.
हायरिस्क भागात काम सुरू
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बऱयापैकी आहे. महानगरपालिका अंर्गत असलेल्या हेल्थ सेंटरमध्ये श्रध्दा या परिचरिका म्हणून काम करत आहेत. तिच्यासोबत वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आहेत. मात्र, ज्या भ्घगात काम्घ् सुरू आहे, तो भाग जोखमीचा आहे. शिवाजीनगर ठाणे हेल्थ सेंटरच्या परिसरात सुमारे 80 हजार लोकसंख्या आहे. ‘कोरोना’ची लक्षणे असलेला रुग्ण आढळल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलविणे, त्याच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करून माहिती वरिष्ठांना देणे, रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात नेऊन ठेवणे असे कामाचे स्वरुप आहे. येथे दर दोन दिवसांनी एक रूग्ण सापडतो. पीपीई कीट, मास्क व आवश्यक काळजी घेऊनच काम सुरू असल्याचे त्या सांगतात.
आपले पती मेकॅनिकल इजिनिअर आहेत. ते सध्या घरातूनच काम करत आहेत. तीन वर्षाच्या मुलीची काळजीही तेच घेतात. माझी कन्या हार्दिका रोज माझ्या वाटेकडे डोळे लावून असते. बेल वाजली की दरवाजाकडे येत ‘मम्मा, मला जवळ घेत का नाही’, असा प्रश्न करते. त्यावेळी मनाला वेदना होतात, असे श्रद्धा यांनी सांगितले.
जिथे आहात तिथेच रहा!
आपल्या गावाकडील हजारो लोक मुंबईत आहेत. अनेकांना आपल्या घरी (गावी) जाण्याचे वेध लागले आहेत. मात्र, जे लोक रेड झोनमध्ये राहतात, त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी राहणे त्यांच्या हिताचे आहे. जर गावाकडे कोरोनाची लागण झाली तर त्याचा त्रास सर्वांना होईल. यासाठी जमेल तसे घरात राहा, असा सल्ला श्रद्धा यांनी दिला आहे.









