पाकिस्तानी नागरिकांनीही राखले अंतर : निकृष्ट सामग्री पुरवठय़ासाठी चीन जगात कुप्रसिद्ध
वुहानमधून पूर्ण जगात फैलावलेल्या कोरोना विषाणूमुळे चीनने विश्वासच गमाविला आहे. चीनला स्वतःच्या कोविड-19 लसीसाठी खरेदीदार शोधणे अवघड ठरू लागले आहे. विशेष म्हणजे त्याचा सर्वकालीन मित्र पाकिस्तान चिनी लसीची चाचणी करत असला तरीही पाकिस्तानी जनतेला या लसीवर काडीमात्र विश्वास नाही. चीनने कंगाल पाकिस्तानात 70 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करूनही ही स्थिती निर्माण झाली आहे. चीनने कोरोना लसीवरून पाकिस्तान, इंडोनेशिया, ब्राझील समवेत अनेक विकसनशील देशांच्या जनतेदरम्यान सर्वेक्षण करत अधिकाऱयांची मते जाणून घेतली आहेत. यात चीन स्वतःच्या कोरोना लसीसंबंधी कोटय़वधी लोकांना आश्वस्त करण्यास अपयशी ठरल्याचा खुलासा झाला आहे.
चीनला मोठा झटका

याचदरम्यान आतापर्यंत चिनी लसीच्या अंतिम टप्प्यातील परीक्षणासंबंधी काहीच स्पष्टता नाही. केवळ संयुक्त अरब अमिरात आणि चीन या देशांनीच या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. याचदरम्यान काही अमेरिकन तसेच युरोपीय कंपन्यांनी सुरक्षा आणि प्रभावोत्पादकतेसंबंधी स्वतःची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. तसेच या लसी देण्यासही आता प्रारंभ झाला आहे. तर अनिश्चिततेमुळे आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत प्रभाव वाढविण्याच्या चीनच्या मोहिमेला मोठा झटका बसला आहे.
निकृष्ट दर्जाचा इतिहास
कोरोना महामारीच्या प्रारंभी चीनने अनेक देशांना दर्जाहीन मास्क आणि पीपीई सूटची निर्यात केली होती, यामुळे देखील त्याच्या लसीबाबत लोकांना विश्वास नाही. चीनच्या लसीच्या प्रभावामध्ये विविध देशांमध्ये मोठा फरक दिसून येत आहे. चीनच्या सिनोवॅक कंपनीची लस कोरोनावॅकची ब्राझील तसेच तुर्कस्तानात चाचणी करण्यात आली आहे. या दोन्ही देशांच्या अधिकृत विदानुसार चिनी लसीने ब्राझीलमध्ये 50 टक्के तर तुर्कस्तानात 91.25 टक्के उपयुक्तता दर्शविली आहे. अशा स्थितीत चीनच्या लसीच्या प्रभावात मोठा फरक का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
ब्राझीलमध्ये 50 टक्के प्रभावी

चीनच्या सिनोवॅक बायोटेकच्या कोरोना लसीच्या परीक्षणाचा विदा ब्राझीलच्या संशोधकांनी मांडला आहे. ही लस ब्राझीलच्या लोकांवर सुमारे 50 टक्क्यांच्या आसपास उपयुक्त असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या लसीची लेट स्टेज ट्रायल पूर्ण करणारा ब्राझील हा पहिला देश आहे. पूर्ण विदावर प्रक्रिया करण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याचे संशोधकांनी नमूद पेले आहे.
द्विपक्षीय संबंध अन् लस
चीनचे ब्राझीलसोबत चांगले संबंध नसल्याचे मानले जाते. ब्राझीलचे अध्यक्ष अनेकदा चीनच्या विरोधात टिप्पणी करत असतात. तर तुर्कस्तानला चीनचा अत्यंत घनिष्ठ मित्र मानले जाते. अमेरिकेने निर्बंध लादल्यावर तुर्कस्तान आणि चीनचे संबंध अधिकच चांगले झाले आहेत. चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी तुर्कस्तानचे विदेशमंत्री कैवसोग्लू यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
विश्वासहीनतेचे संकट
गरीब देश चीनवर अवलंबून असल्याने जगासमोर एक मोठे राजनयिक संकट निर्माण होऊ शकते. चीनने पुरविलेली लस गुणवत्ताहीन असल्याचे बहुसंख्य लोकांना वाटू लागले आहे. कोरोना लस गरीब देशांना स्वतःसोबत घेण्याकरता चीनला उपयुक्त ठरू शकली असती. या गरीब देशांना पाश्चिमात्य देशांकडून विकसित लस प्राप्त करणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही.









