कोरोना फैलावाची परिस्थिती हाताबाहेर : बळींमध्ये पन्नाशीच्या आतील जास्त,चोवीस तासात राज्यात 1160 नवे रुग्ण
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात कोरोनाचे थैमान आणि मृत्यूचे तांडव सुरु झाले असून गेल्या 24 तासात म्हणजे मंगळवारी गेल्यावर्षापासून आतापर्यंतचे 26 सर्वाधिक रुग्ण एकाच दिवशी प्राणास मुकले आहेत. नवीन कोरोनाबाधितांचा आकडा एका दिवसात एक हजार पार होऊन 1160 वर पोहोचला आहे. राज्यतील हे चित्र भयानक व स्फोटक आहे. गोमंतकीय जनतेच्या उरात व मनात धडकी भरणारी मृत्यूंची संख्या गेल्या तीन दिवसांपासून वाढत असून अजूनही सरकारला जाग येत नाही हे जनतेचे मोठे दुर्दैव आहे.
या 26 बळींमुळे गेल्यावर्षापासून आतापर्यंतच्या एकूण मृतांचा आकडा उसळी घेऊन 926 वर पोहोचला आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 8241 झाली आहे. संशयित रुग्ण म्हणून 142 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 597 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 440 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होणारे व नव्याने लागण होणारे रुग्ण यांच्यातील दरी वाढत असून बरे होणाऱयांची संख्या कमी होत आहे तर लागण होणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत चालली आहे.
मडगांव, पर्वरी आरोग्य केंद्रात जास्त रुग्ण
मडगांव आरोग्य केंद्रातील कोरोनाचे रुग्ण 1000 च्या दिशेने झेपावत असून 950 वर पोहोचले आहेत. तेथेच राज्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर पर्वरी आरोग्य केंद्रात 705 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून कांदोळी आरोग्य केंद्रात 646 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. म्हापसा व पणजी आरोग्य केंद्राने कोरोना रुग्णांचा 500 चा पल्ला पार केला असून तेथे 501 व 506 जणांची नोंद झाली आहे. फोंडा व वास्को आरोग्य केंद्रानेही 500 चा पल्ला गाठला असून तेथे 516 व 507 रुग्णांची नोंद आहे. केपे आरोग्य केंद्र शंभरीच्या उंबरठय़ावर असून तेथे 99 रुग्ण सापडले आहेत. बाळ्ळी व आणकोण आरोग्य केंद्रे देखील शतकाच्या उंबरठय़ावर असून तेथे अनुक्रमे 96 व 97 रुग्णांची नोंद आहे.
कुडचडे – 136, चिंचिणी – 123, कुडतरी – 135, शिरोडा – 124, नावेली – 165, डिचोली – 125, वाळपई – 125, हळदोणा – 148, कोलवाळ – 135, खोर्ली – 126 आरोग्य केंद्रांनी रुग्णांची शंभरी पार केली आहे. सांखळी – 274, पेडणे – 213, चिंबल – 261, शिवोली – 245, कासावली – 261 या आरोग्य केंद्रानी 200 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत.
मृत्यूमध्ये पन्नाशीच्या आतील रुग्णांची संख्या जास्त
काल झालेल्या 26 बळींपैकी 15 मृत्यू गोमेकॉत, 8 मृत्यू दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, 1 मृत्यू बेतकी आरोग्य केंद्रांत तर 1 मृत्यू उत्तर गोव्यातील खासगी हॉस्पिटलात झाला आहे. 26 पैकी 20 जण पन्नाशीच्या आतील वयाचे असल्याचे समोर आले आहे.
तीन दिवसात 54 जणांचे बळी
सरकारचे व आरोग्य खात्याचे गोव्यातील कोरोनावरील नियंत्रण सुटले असल्याचे एकंदरित आकडेवारी सांगत असून आता खरोखरच जनतेच्या मनात भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीच्या कोरोना लाटेतही एवढे विक्रमी बळी एका दिवसात पडले नव्हते तेवढे आता पडले आहेत. त्यावरुन कोरोनाची धाहकता भयंकर झाल्याचे स्पष्ट होत असून गेल्या 3 दिवसात 54 बळी पडले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बोलविली आज उच्च स्तरीय बैठक
मुख्यमंत्री प्रमोद सावंत काल मंगळवारी दिल्लीला रवाना झाले. तेथे त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना गोव्यातील कोरोना महामारीच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. आज बुधवारी सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्र्यांनी पर्वरीत उच्च स्तरीय बैठक बोलविली आहे. या बैठकीत कृती आराखडा निश्चित करुन नंतर तो जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









