प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक होत चालली आहे. शुक्रवारी एका दिवसात पुन्हा 94 नवे पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले तर केवळ 38 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंतची एकुण रुग्णसंख्या 1576 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 800 झाली आहे. आतापर्यंत 772 जण बरे होऊन घरी गेले आहेत. बळींची संख्या मात्र 4 वर स्थिरावली आहे. सांखळी गाव कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट बनत आहे.
आरोग्य खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार सांखळी गावात 43 कोरोना बाधीत मिळाले आहेत. झुवारीनगरमध्ये 84 रुग्णांची नोंद झाली असून मांहोरहीलमधील रुग्णसंख्या 245 वर पोहोचली आहे. तेथून झालेल्या संपर्कातून 238 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. सडा व बायणा येथे अनुक्रमे 65 व 66 कोरोना बाधीत सापडले आहेत. कुडतरी – 31, न्युवाडे – 39, चिंबल – 27, मोर्ले – 22, खारीवाडा – 30 तर बाळ्ळी येथे 21 कोरोना बाधितांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. वरील सर्व ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट झाल्यात जमा आहेत.
मडगाव – 15, केपे – 12, लोटली – 8, नावेली – 2, गंगानगर, म्हापसा – 13, कामराभाट – 2, काणकोण – 6, नास्नोडा – 1, पर्वरी 3, वेर्णा – 5, फोंडा – 8, वाळपई – 5, माशेल – 3, उसगाव – 2, साळ, डिचोली – 5, बोरी, शिरोडा – 2, पेडणे – 2 अशा अनेक गावात कोरोनाचे रुग्ण मिळाले असून तेथील रुग्णसंख्या वाढत चाचली आहे.
शुक्रवारी चाचणीसाठी 3320 नमुने गोळा
काल शुक्रवारी 3320 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 2609 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 94 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. उर्वरित 617 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
दिवसभरात 127 विदेशी तर 174 देशींचे क्वारंटाईन
दिवसभरात 127 विदेशी तर 174 देशी प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. एकुण 8 प्रवाशांना पॅसिलिटी क्वारंटाईमध्ये ठेवण्यात आले असून 7 जणांना संशयित म्हणून गोमेकॉत आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे. विविध रेसिडेन्सी, हॉटेल्समध्ये मिळूण 101 जणांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे.
अनेक नव्या ठिकाणी व गावात कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असून अगोदर रुग्ण सापडलेल्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. मागील दोन दिवसात 95, 94 अशा मोठय़ा संख्येने कोरोना बाधित सापडल्याने संपुर्ण गोव्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
कोरोनावर नियंत्रण यावे, वाढणारी रुग्णांची संख्या रोखावी यासाठी कोणतीच उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व एकंदरीत सरकार वाढणाऱया कोरोनाच्या संसर्गाची फारशी गंभीरतेने दखल घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जनतेमध्ये चिंता वाढत असून सरकारच्या कारभाराबाबतही संताप व्यक्त होत आहे.









