नवी दिल्ली, बीजिंग / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनसह जगातील बहुतांश देश सतर्क झाले आहेत. चीनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी खबरदारीच्या उपाययोजना करीत आहेत. बऱयाच देशांनी व्हिसा धोरणातही बदल केल्याचे दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही रुग्णालय, डॉक्टर आणि आरोग्य कामगारांना विशेष सल्ला दिला आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीची त्वरित चाचणी करावी. संसर्गाच्या दृष्टीने, रुग्णाला सौम्य, मध्यम किंवा तीव्र म्हणून वर्गीकृत केले जावे असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, भारतात पहिला रुग्ण सापडलेल्या केरळमध्येच दुसरा रुग्णही पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे.
आतापर्यंत चीनमध्ये पसरलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूमुळे 304 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 14 हजार 380 लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाली आहे. आतापर्यंत चीनमध्ये या रोगामुळे दगावलेले लोक हुबेई प्रांतातील असल्याचे ‘नॅशनल हेल्थ कमिशन ऑफ चीन’ने (एनएचसी) स्पष्ट केले आहे. अजूनही जवळपास 2,110 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत 328 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. फिलिपाईनमध्ये करोना विषाणूमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची पुष्टी मिळाली आहे. फिलिपाईन्समध्ये मरण पावलेली व्यक्ती चीनमधील वुहान येथील रहिवासी आहे. चीनबाहेर मृत्यूची ही पहिली घटना आहे.
कोरोना विषाणूची सुरुवात चीनमधल्या वुहानमधून झाली असली तरी आता याचा संसर्ग चीनसोबतच इतर देशांमध्ये झाला आहे. थायलंडमध्ये 2 जण, जपानमध्ये एकाला, अमेरिकेमध्ये एकाला आणि दक्षिण कोरियातही या विषची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. डिसेंबर 2019 पासून चीनमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. नववर्षासाठी चीनमध्ये आलेल्या विविध देशातील लोकांना, यावेळी संसर्ग होऊन तो इतर देशांमध्येही पसरला असल्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे.
चीनमधील वेंगझोऊ शहराला ‘सील’
चीनमधील वेंगझोऊ शहराने रविवारी कोरोनाचा कहर पाहता तेथील रहिवाशांच्या हालचालीवर बंदी घातली आहे. तसेच रस्तेही बंद केले. 90 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात 46 महामार्ग टोलस्टेशन बंद करण्यात आली आहेत. शहरातील सार्वजनिक जागाही बंद करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीची साधनेही रद्द केली असून कार्यालये, शाळा व महाविद्यालयेही महिनाभर बंद राहतील, अशी घोषणा रविवारी करण्यात आली.
कोरोना विषाणूची व्याप्ती वाढत असल्याने चीनमधील वुहान शहरात केवळ 10 दिवसात एक रुग्णालय थाटण्यात आले आहे. याच्या निर्मितीची जबाबदारी सैन्यदलावर देण्यात आली आहे. येथे लष्करातील सुमारे 1400 वैद्यकीय कर्मचारी कोरोना संशयित रुग्णांची काळजी घेणार आहेत.
भारत, ब्रिटन, इंडोनेशियाने
आपल्या लोकांना नेले मायदेशी
भारताने रविवारी वुहान शहरातून 323 भारतीय आणि सात मालदीव नागरिकांना बाहेर काढले. एअर इंडियाच्या विमानाने वुहान येथून 323 भारतीय आणि मालदीवच्या सात नागरिकांसह रवाना झाल्याची माहिती चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिश्री यांनी दिली. आतापर्यंत चीनमधून 654 लोकांना भारतात आणण्यात आले आहे.
चीनमधून येणाऱया प्रवाशांवर ईस्राईलमध्ये बंदी
ईस्राईलने चीनमधून येणाऱयांवर बंदी घातली आहे. ही बंदी ईस्राईलच्या नागरिकांना लागू होणार नाही असे गृह मंत्रालयाने नमूद केले आहे. 14 दिवसात चीनमध्ये जाणाऱया परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालणारा ईस्राईल हा जगातील तिसरा देश ठरला आहे.
भारताकडून ई-व्हिसा पद्धत कडक
भारताने ई-व्हिसा पद्धतीत काही कालावधीसाठी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी नागरिकांसह चीनमधून येणाऱया पर्यटकांना देण्यात येणाऱया ई-व्हिसा सुविधा भारताने अधिक कडक केली आहे. भारतीय दुतावासाने यासंबंधी निवेदन जारी केले असून त्याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले आहे. भारताबरोबरच बांगलादेशने चिनी प्रवाशांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ सुविधा बंद केली आहे. चिनी नागरिकांना त्यांच्या प्रकल्पांसाठी नियुक्त करू नये, असे सरकारने कंपन्यांना निर्देश दिले आहेत.
भारतातही अतिदक्षता
कोरोना व्हायरस वेगाने पसरु लागल्यानंतर भारतीय सरकारने वुहान येथे भारतीयांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे धोकादायक ठिकाण झालेल्या वुहानमधील भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. देशात या विषाणूच्या लागणीचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद समन्वयाने काम करणार आहेत. सध्या जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूवर अधिक अभ्यास सुरू आहे.









