- आजपासून अंबलबजावणी सुरु
ऑनलाईन टीम / कल्याण डोंबिवली :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत.

कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, अत्यावश्यक सेवा, औषधी दुकाने व वैद्यकीय सेवा, किराणा, दूध व वृत्तपत्रे, पेट्रोलपंप इत्यादी वगळून सर्व प्रकारच्या आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. फेरीवाले, हातगाडी विक्रेते यांना मज्जाव करण्यात आला आहे.
तसेच महापालिका क्षेत्रातील भाजीमंडई 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. तर, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, पोळीभाजी केंद्र इत्यादी ठिकाणी पार्सल सुविधा सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.








