प्रथमच दिवसभरात सापडले 55 हजारपेक्षा अधिक रुग्ण : 779 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे धडकी वाढत चालली आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाच्या 55,078 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 779 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गुरुवारीही देशात कोरोनाचे 50 हजारहून अधिक रुग्ण सापडले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने 16 लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत भारतामधील 16 लाख 38 हजार 870 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 5 लाख 45 हजार 318 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 10 लाख 57 हजार 805 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येने आतापर्यंतची सर्व आकडेवारी मोडली आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच चिंताजनक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 779 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण कोरोनाबळींचा आकडा 35 हजार 747 वर पोहोचला आहे.
गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात सर्वाधिक 11 हजार 147 रुग्णांची नोंद झाली आहे. आंध्रप्रदेशमध्ये 10 हजार 167, तामिळनाडूत 5 हजार 864 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. बळींमध्येही महाराष्ट्र आघाडीवर असून तेथे जवळपास 15 हजार जणांचा बळी गेला आहे. दिल्लीमध्ये 3,936, तामिळनाडूमध्ये 3838, गुजरातमध्ये 2418, कर्नाटकात 2230, उत्तर प्रदेशमध्ये 1587, पश्चिम बंगालमध्ये 1536, आंध्रप्रदेशमध्ये 1218, मध्यप्रदेशमध्ये 857 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
दिल्लीतील स्थिती नियंत्रणात
दिल्लीमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची गती नियंत्रणात आली आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या यादीत दिल्ली देशाच्या टॉप-10 राज्यांतून बाहेर पडली आहे. आता दिल्ली 11 व्या स्थानावर पोहोचली आहे. दिल्लीत केवळ 10,743 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या दिल्लीत दररोज सुमारे 1 हजार नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदविली जात आहेत. दिल्लीत आतापर्यंत 10 लाखाहून अधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.









